भोपाळ : आज हिंदु धर्माविषयी प्रेम असणार्यांचे संघटन होत आहे. या संघटनासह धर्माभिमानी हिंदूंनी धर्माचरणाद्वारे चरित्र निर्माण करणेही आवश्यक आहे. चरित्र निर्माण केल्यास हिंदु समाज जोडला जाऊ शकतो, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते येथील लालघाटी परिसरातील युवा केंद्रात धर्म रक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु धर्माभिमानी श्री. नीरज सिंह, हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. योगेश व्हनमारे, श्री. अखिलेश मिश्रा आणि धर्मरक्षक संघटनेचे संस्थापक श्री. विनोद यादव उपस्थित होते.
पू. डॉ. पिंगळे पुढे म्हणाले, ‘‘आज भारतात रहाणारे मुसलमान मक्केच्या दिशेने तोंड करून नमाजपठण करतात आणि हजला जाऊन येतात. ख्रिस्ती त्यांचे श्रद्धास्थान जेरूसेलमला जाऊ शकतात; पण स्वतंत्र भारतात हिंदू आजही प्रभू श्रीरामाच्या जन्मस्थळी पूजाअर्चा करू शकत नाहीत. श्रीकृष्णाच्या जन्मस्थळाच्या जागेवरही आज अतिक्रमण झाले आहे. ही स्थितीच हिंदु राष्ट्राची आवश्यकता स्पष्ट करते. त्यासाठी सर्वांनी संघटित व्हायला हवे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात