इंदौर – देश आणि धर्म या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत, असा भ्रम राजकारण्यांनी पसरवलेला आहे. आद्य शंकराचार्यांनी प्रत्येक प्राणिमात्राची ऐहिक आणि पारमार्थिक उन्नती आणि समाजव्यवस्था उत्तम रहावी, हे ज्यामुळे साध्य होते, त्याला धर्म म्हटले आहे. आज प्रत्येकाने आपले कर्तव्य अर्थात धर्म सोडल्याने देशात अराजकाची स्थिती आहे. जेव्हा लोक खर्या अर्थाने धर्म समजून त्याप्रमाणे आचरण करतील, तेव्हाचा राष्ट्राचा विकास होईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी केले. ते ४ जानेवारीला येथील शिवसाई मंदिरात भारत स्वाभिमान मंचच्या वतीने आयोजित बैठकीत बोलत होते. बैठकीच्या प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. योगेश व्हनमारे यांनी प्रस्तावना केली. भारत स्वाभिमान मंचचे श्री. राजदीपजी यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.
पू. डॉ. पिंगळे पुढे म्हणाले की, आज जगामध्ये ख्रिस्त्यांची १५७, मुसलमानांची ५२ राष्ट्रे आहेत; पण बहुसंख्य हिंदु असलेला भारत निधर्मी आहे. जगात हिंदूंचा एकही देश नाही. जगात सर्व देश आपल्या पंथाचा अभिमान बाळगत असतांना हिंदूंनी स्वतःला निधर्मी म्हणणे भाबडेपणाचे आहे. आज हिंदू धर्माचरण विसरून पैसा कमावण्याच्या मागे लागला आहे; अन्य पंथ मात्र स्वतःचा पंथ वाढवण्याच्या मागे लागले आहे. आपला सर्वश्रेष्ठ धर्म, संस्कृती आणि परंपरा वाचवण्यासाठी उदासीनता सोडून देश आपल्याला देश आणि धर्म यांसाठी कार्य करायला हवे.