सुमारे दोन वर्षांपूर्वी चीनमध्ये सुरू झालेल्या योग कॉलेजची लोकप्रियता वाढत असल्यामुळे आता या कॉलेजच्या शाखा वाढणार आहेत. चीन-भारत योग कॉलेज आणि पेइचिंग जिमेईचेनमेई गुंतवणूक कंपनीने रविवारी, १५ जानेवारी रोजी खुनमिंग येथे एका सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या अंतर्गत या दोन्ही संस्था मिळून खुनमिंग, पेइचिंग, शांघाई आणि क्वांगतोंग यांसह १० शहरांमध्ये शाखा संस्था किंवा शिक्षण केंद्रांची स्थापना करणार आहेत. तसेच, येत्या ५ वर्षांत चीनमध्ये ५० शाखा, १०० शिक्षण केंद्र आणि योगवर्ग सुरू करण्याची त्यांची योजना आहे.
या करारानंतर चीनमध्ये योगाच्या विकासासाठी सहकार्य सुरू होईल, अशी अपेक्षा चीन-भारत योग कॉलेजचे अधिष्ठाता छन लूयेन यांनी व्यक्त केली. चीन-भारत योग कॉलेजची स्थापना जून २०१५ मध्ये झाली होती. चीन आणि भारताने स्थापन केलेले हे जगातील पहिले योग कॉलेज आहे.
खुनमिंग प्रांतातील युन्नान मिंजु यूनिवर्सिटीमध्ये हे योग कॉलेज आहे. सध्या येथे सुमारे तीन हजार विद्यार्थी मोफत योग शिकत आहेत.
या कॉलेजचे उपसंचालक लू फैंग यांच्या म्हणण्यानुसार, विशेष प्रसंगी कर्मचाऱ्यांना योग शिकविण्यासाठी या महाविद्यालयातील योग शिक्षकांना अनेक कंपन्या आणि सरकारी कार्यालयांतून मागणी येते. त्यातही भारतीय योग शिक्षकांकडून ही कला शिकण्याची इच्छा असणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. या कॉलेजातून सध्या डिग्री मिळत नाही, परंतु येथील विद्यार्थ्यांना भारतीय महाविद्यालयांमध्ये शिकण्याची संधी मिळते.
संदर्भ : माझा पेपर