देहलीच्या जेएनयू विश्वविद्यालयामध्ये काश्मीरविषयक एक भारत अभियानच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नवी देहली : राष्ट्रविरोधी वातावरण असणार्या जेएनयू मध्ये हा कार्यक्रम आयोजित करणे एक कौतुकास्पद कार्य आहे. यासाठी पनून कश्मीर आणि अभाविप यांचे अभिनंदन ! काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन हा केवळ काश्मीरचा विषय नाही, तर संपर्ण देशाचा विषय आहे. जर काश्मीर भारतापासून स्वतंत्र झाले, तर धर्मांधांना वाटणार की, आपण भारतापासून आताही वेगळे होऊ शकतो; परंतु आम्ही हे होऊ देणार नाही. यासाठी हे अभियान चालवण्यात आले आहे, असे प्रतिपादन बंगालमध्ये हिंदूंसाठी कार्यरत असणार्या हिंदु संहती या संघटनेचे अध्यक्ष श्री. तपन घोष यांनी केले. १६ जानेवारी या दिवशी येथील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयामध्ये (जेएनयूमध्ये) काश्मीरविषयक एक भारत अभियानाच्या अंतर्गत हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी यांच्या संघटनांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि पनून कश्मीर यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात देहली, हरियाणा, बंगाल, महाराष्ट्र, गोवा, केरळ, तमिळनाडू आदी राज्यांतील कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. शिवसेना, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस, हिंदु संहती, हिंदु मक्कल कत्छी, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आदी संघटनांचा यात सहभाग होता. या वेळी सभागृहाबाहेर साम्यवादी विचारांच्या विद्यार्थ्यांकडून सभेला विरोध करण्यात आला.
मान्यवरांचे विचार
१. श्री. राधाकृष्णन्, शिवसेना राज्यप्रमुख, तमिळनाडू : हा केवळ काश्मीरचा प्रश्न नाही, तर आमचा प्रश्न आहे. यासाठी आम्ही येथे आलो आहोत.
२. श्री. अर्जुन संपत, हिंदु मक्कल कत्छी (हिंदू जनता पक्ष) : काश्मीरमध्ये हिंदूंचे जे झाले, तेच आता तमिळनाडूतही होत आहे. पुढे संपूर्ण देशात होऊ नये म्हणून पनून काश्मीरची आवश्यकता आहे.
३. श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था : ९ फेब्रुवारी २०१६ या दिवशी येथेच राष्ट्रविरोधी घोषणा देण्यात आल्या. आज एक वर्षाच्या आत या साम्यवाद्यांच्या विरोधात येथे आपण काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाविषयी कार्यक्रम घेऊन त्याला उत्तर दिले. देशाला आज हिंदुत्वनिष्ठ पंतप्रधान लाभले आहेत. आम्हाला अपेक्षा आहे की, ते आम्हाला पनून काश्मीर मिळवून देतील.
४. श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती : एक भारत अभियानाच्या माध्यमातून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना संघटित झाल्या आहेत. आता ही लढाई चालू ठेवत आम्ही वाटचाल करू आणि पनून काश्मीर मिळवू. १९ जानेवारी हा दिवस काश्मिरी हिंदू विस्थापन दिन म्हणून घोषित करावा.
५. श्री. सुरेश चव्हाणके, संपादक, सुदर्शन वाहिनी : गेल्या वर्षभरात काश्मिरी हिंदूंसाठीच्या या आंदोलनाला गती मिळाली आहे. याला अधिक तीव्र करायला हवे. मी या आंदोलनासमवेत आहे.
६. श्री. ललित पांडेय, अभाविप, जेएनयू : साम्यवादी अन्य देशांतील शरणार्थीसाठी आवाज उठवतात; मात्र देशातील विस्थापित हिंदूंसाठी आवाज का उठवत नाहीत ?
७. श्री. विजय टिक्कू, उपाध्यक्ष, पनून कश्मीर : २७ वर्षांपूर्वी आम्हाला काश्मीरमधून प्रथम बाहेर काढले गेले आणि आज आम्ही आमचे विचार येथे मांडण्यासाठी आलो, तरी आम्हाला विरोध केला जातो.
८. डॉ. शशि तोषकनी, प्राध्यापक, जेएनयू : जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणाबाजी करण्यात आली, तेव्हा आम्ही त्याला विरोध केला होता. काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनावर आपण आवाज उठवणार नाही, तर कोण उठवणार ?
या वेळी पनून कश्मीरचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राहुल कौल, पनून कश्मीरचे सुशिल पंडित हे उपस्थित होते.
सनातनद्वेषाची कावीळ झालेले साम्यवादी !
साम्यवादी संघटनेकडून सभेला आणि सनातन संस्थेला विरोध
सभेच्या वेळी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियन या साम्यवादी संघटनेकडून विरोध करण्यात आला. यात विद्यालयातील ३० विद्यार्थी सहभागी झाले होते. सभा आयोजित करण्यात आलेल्या सभागृहाबाहेर या विद्यार्थ्यांकडून डफली हातात घेऊन सनातन संस्था मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. सनातन ज्या हिंदु राष्ट्राचा विचार मांडते, त्यात दलित, मुसलमान आणि महिला यांना कोणतेही स्थान नाही, अशा प्रकारच्या घोषणाही देण्यात आल्या. (सनातनचे हिंदु राष्ट्राच्या संदर्भातील विचार जगजाहीर असतांना अशा प्रकारचा आरोप करून घोषणा देणारे साम्यवादी इस्लामी देशांतील हिंदूंच्या स्थितीविषयी मात्र मौन बाळगतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
क्षणचित्र
निदर्शने करणार्यांमध्ये काही विद्यार्थिनीही होत्या आणि त्या धूम्रपान करत होत्या. (संघटनेत असणार्या अशा विद्यार्थिनी भारतीय संस्कृतीचे संवर्धन करणार्या सनातन संस्थेवर गरळओक करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात