Menu Close

नारायणगंज हत्याकांड प्रकरणात बांगलादेशात २६ जणांना फाशीची शिक्षा

ढाका – भारताने प्रत्यावर्तन केलेला एक माजी नगरसेवक व बांगलादेश सुरक्षा दलाचे तीन वरिष्ठ अधिकारी यांच्यासह २६ जणांना नारायणगंज हत्याकांड प्रकरणात बांगलादेशातील न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. नारायणगंज येथे २०१४ मध्ये हे हत्याकांड झाले होते. त्यात सात जणांचा क्रूरपणे खून करण्यात आला होता. नारायणगंजचे जिल्हा व सत्र न्यायाधीश सय्यद इनायत हुसेन यांनी सांगितले, की २६ आरोपींवरील गुन्हा शाबित झाला असून त्यांना मरेपर्यंत फाशी देण्यात यावे. या आरोपींना कडक बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले होते.

नारायणगंजचे माजी नगरसेवक नूर हुसेन, बांगलादेश लष्कराचे माजी लेफ्टनंट कर्नल तारेक सईद यांच्यासह २६ जणांचा शिक्षा सुनावण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. सईद हे कॅबिनेट मंत्र्याचे जावई आहेत. जलद कृती दलात ते वरिष्ठ अधिकारी होते. इतर दोन जणांमध्ये एक मेजर व एक नौदलाचा लेफ्टनंट कमांडर यांचा समावेश आहे. अरिफ हुसेन व एम.एम राण अशी त्याची नावे आहेत. इतर २३ आरोपींना त्यांच्या अनुपस्थितीत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. इतर नऊ जणांना वेगवेगळ्या कालावधीची तुरूंगवासाची शिक्षा देण्यात आली. यातील हुसेन हा देशाबाहेर पळाला होता पण त्याला भारताने पुन्हा बांगलादेशच्या ताब्यात दिले होते. त्या हत्याकांडात तोच सूत्रधार होता. भारतातील सीमा सुरक्षा दलाने त्याला १२ नोव्हेंबर २०१५ रोजी बांगलादेश सीमा सुरक्षा दलाच्या ताब्यात दिले होते, त्यापूर्वी त्याला पश्चिम बंगालमधील तुरूंगात ठेवण्यात आले होते. इस्लाम व हुसेन हे सत्ताधारी अवामी लीगचे आहेत.

न्यायालयाने या प्रकरणात एकूण ३५ जणांना दोषी ठरवले आहे. या हत्याकांडातील सात जणांना एका वाहनात बसवून विषारी इंजेक्शन देऊन त्यांची प्रेते नदीत फेकण्यात आली होती, त्यांची पोटेही फाडली होती, त्यात नगरसेवकाचे दोन चालक व एक वकील यांचा समावेश होता. आरोपींच्या फाशीच्या शिक्षेवर बांगलादेश उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब होणे अजून बाकी आहे.

स्त्रोत : लोकसत्ता

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *