फरीदाबाद (हरियाणा) – महाभारतात भगवान श्रीकृष्णाने कौरवांकडे ५ गावांची मागणी केली होती; मात्र त्यांनी ती फेटाळली. त्यानंतर महाभारताचे युद्ध घडले. त्याचप्रमाणे भारतातील हिंदू काश्मिरी हिंदूंच्या पनून कश्मीरची (काश्मीरमध्ये हिंदूंसाठी स्वतंत्र प्रांतांची मागणी) मागणी करत आहेत; मात्र सरकार गप्प आहे. काश्मीरमधून हिंदूंचे पलायन झाले असले, तरी आम्ही अद्याप हार मानलेली नाही. आमचे दायित्व आहे की, पनून कश्मीरची स्थापना आणि हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत कार्य करत रहाणे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथे केले. येथील सेक्टर ३७ मध्ये असणार्या काश्मिरी भवनामध्ये यूथ फॉर पनून कश्मीर आणि काश्मिरी पंडित वेलफेअर असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी देहली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बंगाल, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांतून आलेले हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी यात सहभागी झाले होते. येथे हिंदु जनजागृती समितीद्वारा काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाविषयी बनवण्यात आलेले फॅक्ट प्रदर्शन लावण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर सर्व मान्यवर जम्मूसाठी मार्गस्थ झाले. येथे काश्मिरी हिंदूंसाठीच्या एक भारत अभियानांतर्गत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाद्वारे काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र पनून कश्मीर प्रांत बनवला जावा, त्यात भारताची राज्यघटना लागू करावी, ३७० कलम रहित करावे आणि १९ जानेवारीला काश्मिरी विस्थापन दिन सरकारने घोषित करावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
मान्यवरांचे विचार
१. श्री प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना, कर्नाटक : हा केवळ काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाचा प्रश्न नाही, तर संपूर्ण देशाची समस्या आहे. हिंदूंना १९९० मध्ये काश्मीरमधून का हाकलण्यात आले ? ते दंगल करत होते का ? कि त्यांच्या घरांमध्ये शस्त्रे होती ? त्यांना केवळ ते हिंदु होते म्हणूनच हाकलण्यात आले. अशीच समस्या संपूर्ण देशात चालू झाली आहे. यासाठी एक भारत अभियानाची आवश्यकता आहे.
२. श्री. तपन घोष, हिंदु संहती, बंगाल : १९४७ मध्ये काश्मीरमध्ये जशी लोकसंख्या होती, तशी आज झाली पाहिजे. यासाठी देशभरातून १५ टक्के हिंदूंना तेथे जाऊन रहाण्याची आवश्यकता असेल, तर ती पूर्ण केली पाहिजे. जर आज काश्मीरमधील धर्मांधांना एक काश्मीर बनू दिले, तर देशात अनेक असे काश्मीर निर्माण होतील.
३. श्री. राधाकृष्णन्, शिवसेना, तमिळनाडू : तमिळनाडू एक आध्यात्मिक क्षेत्र आहे. कन्याकुमारी भगवतीदेवीचे क्षेत्र आहे. तसेच काश्मीर सरस्वतीदेवीचे क्षेत्र आहे. आम्ही काश्मिरी हिंदूंच्या विषयावर तमिळनाडूमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला. कारण भगवतीदेवी आणि सरस्वतीदेवी एकच आहेत. अर्थात आम्ही सर्व भारतीय एक आहोत.
४. अधिवक्ता चेतना शर्मा, हिंदु स्वाभिमान, उत्तरप्रदेश : काश्मीरप्रमाणे आता उत्तरप्रदेशातही स्थिती निर्माण होऊ लागली आहे. तेथील कैरानामध्ये हिंदूंचे पलायन झाले, तशी राज्यात अन्यत्रही होऊ लागले आहे. पुढील १० वर्षांत भारत हिंदु राष्ट्र होईल किंवा हिंदुविहीन राष्ट्र होईल.
५. श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती : एक भारत अभियानच्या माध्यमातून संपूर्ण देशातील हिंदुत्वनिष्ठ संघटित झाले आहेत. जोपर्यंत पनून कश्मीरची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत हा संघर्ष चालूच राहील.
६. श्री. अभय वर्तक, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था : भारताचे पंतप्रधान हिंदुत्वनिष्ठ आहेत. त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की, ते पनून कश्मीर बनवून देतील. तसेच १९ जानेवारी काळा दिवसाच्या स्वरूपात ओळखला जावा, अशीही मागणी पंतप्रधानांकडे करण्यात येणार आहे. सनातन पंचांगाच्या माध्यमातून यापूर्वीच १९ जानेवारी काश्मिरी हिंदु विस्थापन दिन म्हणून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात