काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी संघटित होण्याचा निर्धार करत धर्माभिमान्यांनी स्वाक्षरी मोहिमेला दिला उदंड प्रतिसाद
नंदुरबार : काश्मीरमध्ये ९० च्या दशकात आतंकवाद फोफावत असतांना भारतातील अन्य हिंदू ‘आम्हाला काय करायचे त्याचे’ या तटस्थ भूमिकेत राहिले. हिंदू संघटित होऊन हिंदूंच्या साहाय्यासाठी धावून गेले नाहीत. त्यामुळे हा आतंकवाद देहली-मुंबईमार्गे मालेगाव, धुळे, नंदूरबारपर्यंत पसरलेला आहे. आता तरी हिंदूंनी एकत्र यायला हवे, असे मार्गदर्शन भाजप ओबीसी मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष श्री. विजयभाऊ चौधरी यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मोठा मारुती मंदिर सभागृहात लावण्यात आलेल्या ‘फॅक्ट’ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. श्री. विजयभाऊ चौधरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी श्री. विजयभाऊ चौधरी यांनी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने घेण्यात येणार्या उपक्रमांचे कौतुक केले. हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
उपस्थित मान्यवर
शिवसेनेचे उपसंपर्कप्रमुख श्री. दीपक गवते, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. पंकज चौधरी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. विजय चौधरी, अखिल भारतीय महाराणा प्रताप युवा मंचचे जिल्हाध्यक्ष श्री. जितेंद्र राजपूत, जनसुराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. मयुर चौधरी
विशेष
१. या वेळी काश्मिरी हिंदूंना न्याय देऊन त्यांचे पुनर्वसन होण्यासाठी राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या निवेदनावर शेकडो राष्ट्रप्रेमींनी स्वाक्षरी करून या अभियानास पाठिंबा दर्शवला.
२. या प्रसंगी ‘..आणि जग शांत राहिले’, ही ध्वनीचित्रफीतही दाखवण्यात आली. ती पाहून अनेकांनी काश्मिरी हिंदूंची स्थिती पाहून हृदय हेलावले, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
या वेळी शिवसेनेचे उपसंपर्कप्रमुख श्री. दीपक गवते आणि युवा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. पंकज चौधरी म्हणाले, ‘‘काश्मिरी हिंदू आपलेच बांधव असल्याने त्यांच्या अधिकारांसाठी लढणे आपले कर्तव्य आहे. आज धर्मांधांचा प्रचंड त्रास वाढलेला आहे. जागोजागी त्यांचा उच्छाद वाढल्याने हिंदू त्रस्त झाले आहेत. त्यासाठी आपण संघटितपणे विरोध केल्याशिवाय हे थांबणार नाही.’’
या वेळी श्री. दीपक गवते आणि श्री. पंकज चौधरी यांनी उपस्थितांमध्ये क्षात्रतेज आणि वीररस निर्माण करणार्या घोषणा दिल्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात