मंगळुरू : येथील रणरागिणी शाखेच्या वतीने बोंधेल येथील रोटरी बालभवनामध्ये स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाबाई यांची नुकतीच जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला सौ. प्रमिला रमेश या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
सौ. प्रमिला रमेश म्हणाल्या, ‘‘सध्या हिंदु महिलांना रणरागिणीसारख्या संघटनांची आवश्यकता आहे. समाजाची सद्य:स्थिती पहाता महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आणि ईश्वराची कृपा संपादन करण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. स्वत:चे आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक हिंदु महिलेने राजमाता जिजाबाई यांच्या प्रमाणे वीरमाता होणे आवश्यक आहे.’’
सौ. आशा गौरी यांनी स्वामी विवेकानंद यांचे योगदान आणि कर्तृत्व यांवर प्रकाश टाकला. देशातील प्रत्येक युवकाने स्वामी विवेकानंद यांची तत्त्वे आत्मसात केली पाहिजेत. राष्ट्रनिर्मिती आणि धर्मरक्षण यांसाठी सर्वांनी संघटित झाले पाहिजे, असे सौ. आशा गौरी यांनी सांगितले. रणरागिणीच्या वतीने सौ. लक्ष्मी पै म्हणाल्या, ‘‘जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लहानपणी धार्मिक संस्कार केले. त्यांना योग्य शिक्षण दिले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज शूर योद्धा होऊ शकले. सध्याच्या काळात आपल्याला जिजाबाई यांच्यासारख्या माता हव्या आहेत.’’
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अंकिता कामत यांनी केले. या कार्यक्रमाला विविध संघटनांच्या महिला सहभागी झाल्या होत्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात