Menu Close

नांदेडमध्ये लाच घेण्यासाठी पोलिसांनी आरोपीच्या आईचे मंगळसूत्र विकले

नांदेड : एका प्रकरणात अटक न करण्यासाठी नांदेड पोलीस दलातील एका पोलिसाने ५ हजार रुपयांची लाच मागितली. आपल्याकडे पैसे नाहीत त्यामुळे आईचे मंगळसूत्र विक्री करून पैसे द्यावे लागतील असे आरोपीने सांगूनही या भ्रष्ट पोलिसाने मंगळसूत्र विक्री करायला लावून लाचेची ५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. आता हा पोलीस आणि त्याचा साथीदार एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे.

आरोपीची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोपी आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद सुरु होता. रागाच्या भरात आरोपीच्या पत्नीने त्याच्याविरोधात उमरी पोलीस स्थानकात एक तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यावर पोलीस हवालदार उद्धव घुले यांनी आरोपीला अटक करण्याची धमकी दिली आणि अटक टाळायची असेल तर ५ हजार रुपये लाच देण्याचे फर्मान सोडले.

मोलमजुरी करणारा आरोपी एवढे पैसे देऊ शकत नव्हता. त्याने हवालदार घुलेची खूप विनवणी केली. पण हवालदार लाचेवर ठाम होता. आपल्या आईचे मंगळसूत्र विक्री करूनच रक्कम उभी करावी लागेल, असे आरोपीने हवालदार घुले याना सांगितले. तरीही घुले यांना दया आली नाही. उलट हवालदार घुले याने मंगळसूत्र विक्रीतून आलेले पैसे इतरत्र खर्च न करता लाच देण्याचे फर्मान सोडले.

अखेर आरोपीला आईचे मंगळसूत्र विक्री करून ५ हजार ७०० रुपये मिळाले. इतक्यात एसीबीला संपर्क करण्याचा सल्ला आरोपीला मिळाला. त्याने थेट एसीबीला संपर्क साधला आणि संपूर्ण प्रकार कळवला. एसीबीने सापळा लावला आणि मध्यस्थ अशोक चव्हाण यांच्या मार्फत ५ हजाराची लाच स्वीकारताना मध्यस्थ आणि हवालदार उद्धव घुले एसीबीच्या जाळ्यात अडकले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *