बेंगळुरू येथे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीच्या दोन दिवसीय प्रांतीय हिंदू अधिवेशनाला संतांच्या उपस्थितीत प्रारंभ !
बेंगळुरू – हिंदु जनजागृती समिती राष्ट्र तसेेच धर्म यांसाठी करत असलेले कार्य स्तुत्य आहे. हिंदुत्वाच्या संदर्भातील कार्यक्रमाला समाजात अनेक रीतीने विरोध होतो. सरकारीकरण झालेल्या प्रत्येक देवस्थानातून कोट्यवधी रुपये महसूल मिळतो. त्याचा व्यय कसा होतो, ते कुठे वापरले जातात याची माहिती आपण माहिती आधिकाराच्या हक्काने करून घेऊ शकतो. हिंदु विधिज्ञ परिषदेच्या माध्यमातून आम्ही हिंदु धर्माची अल्पशी सेवा करत आहोत. हिंदु विधिज्ञ परिषदेच्या माध्यमातून बेंगळुरू येथे बेन्निहीनचा प्रवेश, तसेच मंगळुरू येथे डॉ. झाकीर नाईक यांचे भाषण, बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेला किस ऑफ डे अशा अनेक हिंदुविरोधी घटना थांबवण्यात आल्या. प्रत्येक अधिवक्त्याने हिंदूंच्या बाजूने कायदे होईपर्यंत लढा देणे आवश्यक आहे, असे आवाहन अधिवक्ता श्री. अमृतेश एन्.पी. यांनी येथे केले. राष्ट्र तसेच धर्म रक्षणासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी बेंगळुरू येथील श्री आदि चुंचनगिरी समुदाय भवन येथे हिंदु जनजागृती समितीकडून २१ आणि २२ जानेवारी अशा दोन दिवसीय प्रांतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी ते बोलत होते. २१ जानेवारीला विख्यात इतिहासकार डॉ. एम्. चिदानंद मूर्ती, सनातन संस्थेचे संत सद्गुरु सत्यवान कदम, श्री. उमेश शर्मा गुरुजी, अधिवक्ता श्री. दोरेराजु आणि अधिवक्ता श्री. अमृतेश एन्.पी. यांनी केलेल्या दीप प्रज्वलनाने अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. या अधिवेशनात दक्षिण कन्नड जिल्ह्यातील अनेक हिंदू संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. दीप प्रज्वलनानंतर वेदमंत्रांचे पठण करण्यात आले.
हिंदू जनजागृती समितीचे बेंगळुरू येथील समन्वयक श्री. मोहन गौडा यांनी हिंदू अधिवेशनाचा उद्देश श्रोत्यांपुढे मांडतांना सांगितले की, राजकारणी निवडणुकांच्या वेळी
आपला स्वार्थ साधण्यासाठी एकजूट होतात, तर आपण निःस्वार्थी हिंदूंनी धर्म रक्षणासाठी एकजूट का करू नये ?
सनातनचे संत सद्गुरु सत्यवान कदम यांनी हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा संदेश सभेतील श्रोत्यांपुढे मांडला. सनातनच्या याव नामजपवन्नु माडबेकु (कोणता नामजप करावा ?) या कन्नड भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन करतांना डॉ. चिदानंद मूर्ती यांनी ग्रंथाचे मनोगत व्यक्त केले.
हिंदु धर्म कोणत्याही जातीशी संबंधित नाही ! – डॉ. एम्. चिदानंद मूर्ती
मी आजही वेदमंत्रांचा जप करतो. भारत म्हणजे हिंदु धर्म. तो कोणत्याही जातीशी संबंधित नाही. तो सदैव वहाणार्या पवित्र गंगानदीसारखा आहे. आपल्याकडील अनेकांना वेद म्हणजे काय ? हे माहीत नाही. वेदांमध्ये जातीभेद, लिंगभेद अथवा वर्णभेद नाही; परंतु अनेक लोक त्यांच्या अल्प बुद्धीनुसार वेदांवर आरोप करतात. वेदांमध्ये अस्पृश्यता नाहीच. आज देखील आपण पाहिले, तर अनेक मठांच्या मठाधीशांनी समाजात असलेल्या अस्पृश्यतेचे खंडण केले आहे; परंतु स्वतःला बुद्धीवादी म्हणवून घेणारे मूर्ख लोक हिंदु धर्माकडे हीन दृष्टीने पहातात आणि समाजात हिंदु धर्माविषयी अपप्रचार करून हिंदूंच्या धर्मभावनांवर आघात करतात. इतिहास पाहिल्यास टिपूने हिंदु धर्मावर मोठा आघात केला आहे; परंतु अशा हिंदुद्वेषी व्यक्तीची जयंती साजरी केली जाते ही दुर्दैवाची गोष्टच म्हणावी लागेल.
प्रत्येक वाईट आचरणाचा त्याग केला पाहिजे ! – अधिवक्ता श्री. दोरेराजु
काहीजण स्वार्थासाठी कायद्याच्या बाहेर, अनैतिक आणि हीन कृत्ये करतात हे आपण पाहिले आहे. आपण एकजुटीने यासाठी प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक वाईट आचरणाचा आपण त्याग केला पहिजे.
प्रत्येक हिंदूला मी एक हिंदू आहे, हे सांगताना वाटणारे भय दूर झाले पाहिजे ! – श्री. उमेश शर्मा गुरुजी
भारतात जन्म घेऊन परमेश्वराकडून प्राप्त झालेले जीवन राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी वेचले पाहिजे. सामान्य व्यक्ती देखील अधिकारासाठी, स्वार्थासाठी प्रार्थना करते. धर्माभिमानी आपल्या धर्मासाठी देवाला प्रार्थना करतो. राष्ट्र तसेच धर्म यांसाठी कृती करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. प्रत्येकाने सनातन धर्माचा प्रचार केला पहिजे आणि प्रत्येक हिंदुमध्ये असलेले मी हिंदु आहे, हे सांगण्यासाठी भय नष्ट झाले पाहिजे. भारताला हिंदु राष्ट्र बनवणे, हे आपल्या सर्वांचे प्रथम ध्येय असले पाहिजे.
हिंदु संघटना हिंदुत्वासाठी म्हणजेच आमच्यासाठी कार्य करत आहेत – सौ. शोभा, संपादक, स्त्री जागृती
लव्ह जिहाद आज एवढी मोठी समस्या झाली आहे की, ते तसेच चालले तर आपण अनुमाने १० सहस्र हिंदु मुलींना गमावून बसू. मैसुरू येथून ५ मुली बेपत्ता झाल्यावर त्याविषयी पोलिसांकडे तक्रार करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. महाविद्यालयात जाणार्या मुली याचे अधिकतर बळी आहेत. पाश्चात्त्यांच्या अनुकरणामुळे आज आपण आपल्या मुलांना योग्य शिक्षण देत नाही. हे विषय उजेडात आणणार्या हिंदू संघटनांकडे तुच्छतेने पाहून सत्य लपवत आहोत. उद्या हेच सत्य आपल्याला गिळंकृत करील, याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. हिंदुत्वाला आपण प्रोत्साहन दिले पाहिजे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात