Menu Close

जल्लीकट्टू : हिंदूंचे शौर्य जागृत करणारा साहसी खेळ !

तमिळनाडूमध्ये साजरा होणार्‍या पोंगल या सणाच्या कालावधीत जल्लीकट्टू हा  पारंपरिक खेळ खेळण्याची प्रथा सहस्रो वर्षांपासून चालू आहे. याविषयीचा उल्लेख प्राचीन तमिळ साहित्य संघाच्या दस्तावेजात आढळतो. या खेळाविषयी वेगवेगळी माहिती दिली जाते. ती आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

१. जल्ली म्हणजे नाणे आणि कट्टू म्हणजे थैली. पूर्वी या खेळाचे खरे स्वरूप म्हणजे बैलाच्या शिंगाला नाण्यांची छोटी थैली बांधून त्याला मैदानात मोकळे सोडले जात असे. गावातील जो पुरुष त्या बैलाला वश करून ती थैली घेऊन येईल, त्याचा वीर पुरुष म्हणून सन्मान केला जात असे. कालांतराने या खेळात काही पालट होऊन जो पुरुष त्या बैलाच्या वशिंडाला एक मिनिट पकडून राहील (बैल उधळला असतांना) तो म्हणजे विजेता, असे त्याचे सध्याचे स्वरूप झाले आहे.

२. या खेळाचा मुख्य उद्देश म्हणजे भारतीय देशी वंशाच्या गोधनाचे संवर्धन होणे आणि हिदूंमधील वीरता अन् शौर्य जागृत रहाणे, हा असल्याचेही सांगितले जाते. पूर्वीच्या काळी विजेता बैल सामूहिकरित्या मंदिरात ग्राम नंदी म्हणून संभाळला जात असे, तसेच सुदृढ आणि निरोगी गोसंवर्धनासाठी प्रत्येक ३ वर्षांनी आजूबाजूच्या गावातील अशा ग्राम नंदींची अदलाबदल केली जात असे.

३. भागवतम् या ग्रंथाचा संदर्भ देऊन या खेळाविषयी पुढील कथा सांगितली जाते. पंडु राजाची कन्या नीलादेवी (तमिळ भाषेत तिला नैपिणी असे म्हणतात.) हिच्या स्वयंवराच्या वेळी एक पण होता की, जो कोणी ७ बैलांना वश करून दाखवील, त्याचा विवाह राजकन्या नीलादेवीशी करून दिला जाईल. भगवान श्रीकृष्णाने हा पण जिंकून राजकन्येशी विवाह केला.

जल्लीकट्टू या क्रीडा प्रकाराच्या समर्थनार्थ केंद्र सरकारने दिला भगवान श्रीकृष्णाचा, तर तमिळनाडू सरकारने दिला सिंधु संस्कृतीचा संदर्भ !

१. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात जल्लीकट्टूचे समर्थन केले आहे. यासाठी सरकारने भगवान श्रीकृष्ण आणि महाभारत यांचा संदर्भ दिला आहे. बैलांच्या झुंजी हा प्राचीन खेळाचा प्रकार आहे. भगवान श्रीकृष्णाला राजकन्या नागनाजिती हिच्याशी विवाह करण्यासाठी ७ बैलांशी झुंज द्यावी लागली होती. याशिवाय केंद्र सरकारने बैलांच्या शर्यती, बैलगाड्यांच्या शर्यती किंवा जल्लीकट्टू आदी खेळ जैव विविधता जोपासण्यासाठी महत्त्वाचे आहेत, असेही त्यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

२.  तमिळनाडू सरकारनेही सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात जल्लीकट्टूचे पौराणिक महत्त्व विषद केले आहे. त्यात म्हटले आहे, सिंधु संस्कृतीमध्येही जल्लीकट्टूचा उल्लेख आढळतो. पूर्वीही अशा क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जात असत. संविधानाच्या तरतुदीनुसार सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी जल्लीकट्टू होणे आवश्यक आहे.

जल्लीकट्टूवर आक्षेप हे भारताला त्याच्या मूळ संस्कृतीपासून दूर नेण्याचे षड्यंत्र ! – तमिळनाडू राज्य सरकार

काही लोक बहुराष्ट्रीय आस्थापनांच्या हातचे बाहुले बनले असून त्यांना भारताला त्याच्या मूळ संस्कृतीपासून दूर नेण्यासाठी रचण्यात आलेले हे षड्यंत्र आहे, असे तमिळनाडू राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

जल्लीकट्टू खेळात कालौघात निर्माण झालेली विकृती दूर होणे आवश्यक !

सध्याच्या काळात या खेळामध्ये काही विकृती (उदा. बैलांना पळवण्यासाठी मद्य पाजणे, त्यांच्या डोळ्यांत मिर्चीची पूड घालणे, या खेळावर बेटींग (पैज) लावणे आदी) निर्माण झाल्या आहेत. तसेच हिंदु धर्मविरोधकांच्या हस्तक्षेपामुळे तो वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. या खेळातील विकृती दूर होणे आवश्यक आहे, अशी अनेक संस्कृतीप्रेमींची मागणी आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *