Menu Close

जल्लीकट्टूचा उद्घोष !

तमिळनाडू : मकरसंक्रांतीच्या कालावधीत तमिळनाडू राज्यातील गावागावांतून खेळल्या जाणार्‍या वळूंच्या (देशी बैल) खेळाला सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्याने सध्या तमिळनाडू पेटले आहे. गेले ७ दिवस सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून या खेळाला अनुमती मिळावी, यासाठी मोठी चळवळ चालू होऊन जनता सहस्रोंच्या संख्येने यामध्ये उतरली आहे. त्यामुळे तमिळनाडू शासनाला या संदर्भात तात्पुरती अनुमती देण्यासाठी विधानसभेत विधेयक मांडण्यात आले; परंतु जनतेला कायमस्वरूपी तोडगा हवा आहे. जनसंख्येच्या रोषामुळे पोलिसांना त्यांना आवरणे कठीण झाले आहे. मुख्यमंत्र्यांना परत पाठवणे, साखळी करून पोलिसांना विरोध करणे, पोलीस ठाणे जाळणे, वाहनांची जाळपोळ करणे अशा प्रकारे या आंदोलनाने पुढचे पुढचे टप्पे गाठले आहेत.

हिंदूंना प्राणीप्रेम शिकवण्याची आवश्यकता नाही !

पेटा (पीपल फॉर एथिकल ट्रिटमेंट फॉर अ‍ॅनिमल्स) या अमेरिकेच्या तथाकथित प्राणीप्रेमी संस्थेची भारतातही शाखा आहे. या संस्थेने या खेळातून बैलांवर अन्याय होतो म्हणून ‘प्रिव्हेन्शन ऑफ क्रूएल्टी टू अ‍ॅनिमल अ‍ॅक्ट १९६०’ अंतर्गत खटला प्रविष्ट केला. त्यामुळे भारतातील तथाकथित प्राणीप्रेमी आणि हिंदुद्वेष्टे यांनी ‘या खेळात बैलांवर अन्याय होतो आणि माणसांचे प्राणही जातात’, या कारणावरून या खेळाला विरोध चालू केला. वरवर पहाता हे कुणालाही योग्य वाटेल; मात्र यामागील वस्तूस्थिती लक्षात घेतली, तर हिंदु संस्कृतीवर घाला घालणारे हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र लक्षात येईल. ते समजून घेऊन खोट्या प्राणीप्रेमाच्या नावाखाली जल्लीकट्टूसारख्या प्रथांना विरोध करणार्‍या हिंदुद्वेष्ट्यांना सडेतोड उत्तरे देऊन त्यांची तोंडे बंद केली पाहिजेत. या प्रथेला विरोध करणार्‍यांनी न्यायालयालाही अशीच त्रोटक माहिती दिल्याने न्यायालयानेही त्यावर न्याय दिला आहे. आम्ही त्याचा पूर्णतः मान राखतोच; परंतु या संदर्भातील जल्लीकट्टूच्या संदर्भात पुढील सूत्रे अवश्य लक्षात घेतली पाहिजेत.

केवळ २ सहस्र वर्षांची परंपरा असलेल्या नव्हे, तर पुराणकथांमध्येही बैलांना वश करण्याच्या या खेळाचे स्पष्ट संदर्भ आढळतात. हिंदु धर्म हा वनस्पती आणि प्राणी यांसह सर्वच नैसर्गिक गोष्टींसाठी अत्यंत पूरक; किंबहुना त्यांचे संवर्धन करणारा आहे. विश्‍वामित्र ऋषी आणि मेनका यांची मुलगी शकुंतला हिला शकुन्त नावाच्या पक्षाने सांभाळले आहे. देवी सीतेला रावण पळवून नेत असतांना जटायूने अक्षरशः त्याच्याशी युद्ध केले आहे. इतके प्राणीमात्रांशी आमचे जवळचे नाते आहे. आमच्या देवतांची वाहने ही प्राणी आहेत आणि त्यांच्यातील देवत्वामुळे तेही पूजनीय झाले आहेत. इतकेच काय आमच्या देवतांच्या काही अवतारांनी मत्स्य, वराह आदी प्राणीरूपातच अवतरण केलेले आहे. आमच्याकडे नागलोक आहे आणि नागासारखा विषयुक्त जीवही आम्हाला पूजनीय आहे. कासव आमच्या मंदिरात अग्रस्थानी आहे. व्याघ्रापासून मुषकापर्यंत आणि गरुडापासून नंदीपर्यंत सारेच आम्हाला वंदनीय आहेत. हिंदु धर्म शाकाहाराचे समर्थन करणारा धर्म आहे. याउलट पाश्‍चात्त्य देशात धान्य नव्हे, तर प्राण्यांचे मांस हेच प्रथम अन्न आहे आणि तेच राजरोस शिजवून खाल्ले जाते. एवढा हा विरोधाभास आहे. चीनने सर्पाचे बीभत्स रूप साकार केले आहे. त्यामुळे पेटासारख्या संस्थांनी अमेरिकेत राहून तिथेच काय ते प्राणीप्रेम शिकवावे, भारतीय हिंदूंना ते शिकवण्यास येणे, हे हास्यास्पद आहे. पेटाने न्यायालयात या हिंदु परंपरेवर का घाला घातला आहे, ते समजून घेतले पाहिजे.

जल्लीकट्टूचे महत्त्व आणि आंतरराष्ट्रीय षड्यंत्र !

जल्लीकट्टू खेळाच्या निमित्ताने अत्यंत उत्तम अशा देशी बैलांचे प्रदर्शन भरवले जाते. त्यातून बैलाची निगा उत्तम प्रकारे राखण्याला चालना मिळत असते. या उत्सवाच्या निमित्ताने सुदृढ वळूंची मंदिरांकडून देवाण-घेवाण होते आणि पुढचा सुदृढ वंश निर्माण केला जातो. हा जल्लीकट्टूचा सर्वांत मोठा लाभ आहे. सध्या देशी जनावरांचा प्रचंड तुटवडा निर्माण होऊन विदेशी भेसळयुक्त, रोगकारी, विषारी दुधाचे वितरण भारतभर होत आहे. देशी गोवंशच लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. या भयावह संकटाच्या पार्श्‍वभूमीवर या खेळाचे पडद्यामागचे शत्रू हे देशी गोवंश नष्ट करू पहाणारे आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहेत, असा मोठा संशय निर्माण होत आहे. या स्पर्धेत केवळ देशी बैलच खेळू शकतात, कारण ते ताकदवान आणि सुदृढ असतात, जर्सी जनावरांचा यात टिकाव लागत नाही. बैलाच्या वशिंडाला (पाठीवरील उंचवटा) ६० सेकंद पकडणे आणि त्यांच्या शिंगावरील नाण्यांची पिशवी काढणे, अशा या खेळासाठी धैर्यवान अन् ताकदवान युवक लागतो. त्यामुळे साहजिकच हा खेळ भारतियांमधील पौरुषत्व, वीरता आणि शौर्य यांचे जागरण करणारा आहे. सध्या क्षात्रवृत्ती झाकोळल्या भारतीय युवकांसाठी हा प्रेरणा देणारा आहे. यात वळू तर ताकदवान असल्याने त्याच्यावर अत्याचार होण्याचा प्रश्‍न येत नाही. त्या तुलनेत सध्या भारतभर लक्षावधीच्या घरात चालू असलेल्या गोवंश हत्या भयंकर आहेत. त्या बंद होण्याच्या दृष्टीने कायद्याची कार्यवाही होतांना दिसत नाही. हलाल करून गोवंश संपवला जातो, पशूवधगृहात निर्घृणपणे यंत्रात घातला जातो, तेव्हा कुठे जाते प्राणीप्रेमींची ‘अ‍ॅनिमल क्रुएलिटी’ ? आता उरतो प्रश्‍न यात मृत झालेल्या २ व्यक्तीच्या संदर्भातील सूत्राचा. ‘काररेस’, गिर्यारोहण यांसह अनेक खेळांमध्ये व्यक्ती दगावण्याची मोठी शक्यता असते आणि त्या दगावतातही; म्हणून त्यावर बंदी नसते. सिगारेट, मद्य, तंबाखू यांनी व्यक्ती दगावतात, त्यांवर बंदी येत नाही. आतंकवादाने देशभर हिंदू मरत आहेत, त्याला पायबंद नाही. येनकेन प्रकारेण हिंदूंची संस्कृती जिथे म्हणून दिसेल, तिथे तिच्यावर आक्रमण करण्याची मनोवृत्ती हाणून पाडण्यासाठी हिंदूंनी संघटित झाले पाहिजे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *