न्यायालयाच्या आदेशानंतरही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री होते, यावरून अशा विक्रेत्यांवर सरकार कठोर कारवाई करत नाही, हेच लक्षात येथे !
ठाणे : प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेवर न्यायालयाने शासनाला आदेश दिला होता. त्यानंतर केंद्रीय आणि राज्य गृहविभाग, तसेच शिक्षण विभाग यांनी तसे परिपत्रक काढले होते. असे असूनही मुंबई आणि ठाणे येथील बाजारपेठांमध्ये अजूनही प्लास्टिकचे राष्ट्रध्वज, तसेच विविध आकारांतील पदके विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.
प्लास्टिकचे राष्ट्रध्वज, कापडी टोप्या, विविध आकारांतील पदके, खिशाला लावण्यासाठीचे कागदी ध्वज हे मशीद बंदर येथील घाऊक बाजारपेठांमध्ये आणि ठाणे, कल्याण येथील बाजारपेठांमध्ये विकतांना आढळले. राष्ट्रध्वजाचा मूळ आकार पालटून ही पदके बनवल्यामुळे एक प्रकारे राष्ट्रध्वजाचा अपमानच होत आहे. अशा उत्पादनांची विक्री करणार्यांवर कारवाई केल्यानंतर आणि प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचे मूळ उत्पादन केंद्रच बंद केल्यावर राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान टाळता येईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. (राष्ट्रध्वजाचा अवमान होत असतांना त्याची विक्री करणारे, त्यांच्यावर कारवाई न करणारे अधिकारी, पोलीस आणि विकत घेणारे राष्ट्रध्वजाच्या अवमानास उत्तरदायी आहेत ! संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात