अन्य पंथियांविषयी काही न बोलणार्या पुरोगाम्यांचा कांगावा
धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंच्या सर्व धार्मिक गोष्टींना आक्षेप घेतला जातो, तर न्यायालयाचा आदेश असूनही मशिदींवर भोंगे मात्र चालू रहातात. अन्य धर्मीय संघटितपणाच्या बळावर त्यांच्या धर्मानुसार आचरण करतात आणि हिंदूंमधील तथाकथित पुरोगामी हिंदूंचे बुद्धीहनन करून हिंदूंच्या धर्मश्रद्धा कमकुवत करतात. हे रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण आणि धर्माचरणाचे महत्त्व सांगणारे हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : अनेक शासकीय कार्यालयांमध्ये वार्षिक श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात येते. तसेच देवतांची चित्रे, विविध धर्मांची प्रतिके, धार्मिक चिन्हे भिंतीवर लावली जातात. याला यापुढे राज्यशासनाने बंदी घालावी, या मागणीचे पत्र ३० नोव्हेंबर २०१६ या दिवशी राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवण्यात आले आहे. याविषयी शासकीय निर्णय घेण्यासाठी परिपत्रक काढण्यात यावे, अशी मागणी या पत्रामध्ये करण्यात आली आहे. असे झाल्यास सर्वच शासकीय कार्यालयांतून श्री सत्यनारायण पूजा, देवतांची चित्रे आणि धार्मिक चिन्हे लावण्यावर बंदी येईल. याविषयी सामाजिक कार्यकर्ते अरुण विश्वंभर आणि मी बुद्धीस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष अधिवक्ता विश्वास काश्यप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. (सामाजिक कार्यकर्त्यांना धार्मिक गोष्टींचे ज्ञान आहे का ? मशिदींवरील भोंगे आणि मुंबईत अनेक ठिकाणी रस्ते अडवून पढला जाणारा नमाज त्यांना कधी दिसत नाही का ? कि हिंदूंना डिवचण्यासाठी हेतूपुरस्सर अशा मागण्या केल्या जातात ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या तक्रारीत म्हटले आहे की, मुंबईसह राज्यातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांत सत्यनारायण पूजा आयोजित केल्या जातात. अनेक प्रकारच्या पूजा-अर्चा, होम, हळदी-कुंकू, विधी, सण, उत्सव, धार्मिक चित्रे, घोषवाक्ये लिहिली जातात. कार्यालयांमध्ये छुप्या पद्धतीने नमाज पढला जातो. भारताने धर्मनिरपेक्ष राज्यपद्धत स्वीकारली असल्याने हे प्रकार निषिद्ध आहेत. भारतीय संविधानात जनतेला धर्मपालनाचा अधिकार असला आणि शासन त्या अधिकाराला संरक्षण देणार असले, तरी शासनाला स्वतःचा धर्म नसेल, असे म्हटले आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांतील सर्व धर्मांच्या धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालावी. आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून धर्म ही वैयक्तिक गोष्ट आहे. तिचे शासकीय ठिकाणी प्रदर्शन करू नये.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात