‘पार्वती’ चित्रपटागृहासमोर धर्मांधांकडून ‘पाक झिंदाबाद’च्या घोषणा
कोल्हापूर : नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘रईस’ या चित्रपटाच्या विरोधात २५ जानेवारीला ‘क्षत्रिय मराठा रियासत फाऊंडेशन’च्या वतीने येथील ‘पद्मा’ चित्रपटागृहासमोर झेंडूची फुले देत, चित्रपट न पहाण्याचा उद्देश सांगून चित्रपट न पहाण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत अनेक प्रेक्षक चित्रपट न पहाता माघारी फिरले. अशा प्रकारे गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करून धर्माभिमान्यांनी निषेध नोंदवला. या चित्रपटात पाक कलाकार माहिरा खान असल्याने, तसेच अभिनेते शाहरुख खान यांनी आतंकवाद्याची भूमिका वटवल्याने या चित्रपटाला हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि क्षत्रिय मराठा रियासत फाऊंडेशन या संघटनांकडून विरोध होत आहे. चित्रपटात नायकाची भूमिका शाहरुख खान यांनी साकारली आहे. त्यात त्यांनी पाकच्या बाजूने विधाने करतांना, पाकला आर्थिक साहाय्य करतांना, तसेच पाक खेळाडूंना स्थान देत असल्याचे दाखवण्यात आले आहे.
या आंदोलनाच्या वेळी क्षत्रिय मराठा रियासत फाऊंडेशनचे अध्यक्ष सर्वश्री प्रसाद मोहिते, सचिव विपुल घाडगे, कार्यकर्ते सचिन भोसले, शाहूराज भोसले, संजय लंगटकर, सदाशिव पाटील, धर्माभिमानी गोविंद देशपांडे, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक किरण दुसे आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
पोलिसांसमक्ष पाकच्या समर्थनार्थ घोषणा देण्याइतपत उद्दाम झालेले पाकप्रेमी धर्मांध !
पहिला खेळ चालू होण्यापूर्वी ४० मुसलमान तरुणांनी ‘पार्वती’ चित्रपटगृहासमोर ‘रईस’ चित्रपटाचा फलक घेऊन केक कापला. या वेळी त्यांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. या वेळी तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना हटकले. ‘चित्रपटगृहात असा दंगा केल्यास कारवाई करू’, अशी चेतावणी दिली. त्या मुसलमान तरुणांनी एका दुचाकी वाहनावर ‘रईस’ चित्रपटाचे फलक लावले होते. पोलिसांनी ही गाडी कह्यात घेतली. पोलिसांनी दमदाटी केल्यानंतर मुसलमान तरुण चित्रपट पहाण्यासाठी चित्रपटगृहात गेले. पद्मा चित्रपटागृहासमोर एका मुसलमान तरुणाने सुतळी बॉम्ब फोडला. तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना पोलिसांनी त्याला पकडून चोप दिला.
हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतरही सर्व चित्रपटगृहांत ‘रईस’ चित्रपटाचे खेळ चालूच !
‘रईस’ हा चित्रपट प्रदर्शित करू नये, यासाठी २४ जानेवारी या दिवशी बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख सर्वश्री संभाजी साळुंखे, कार्यकर्ते सचिन मांगुरे, प्रशांत कागले, श्री शिवप्रतिष्ठानचे शहरप्रमुख शरद माळी, श्रीराम सेनेचे सागर श्रीखंडे, धर्माभिमानी रोहित राऊत, हिंदु जनजागृती समितीचे मधुकर नाझरे, बाबासाहेब भोपळे, सुधाकर सुतार आदी हिंदुत्वनिष्ठ येथील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गेले. त्या वेळी हिंदुत्वनिष्ठांची पोलीस निरीक्षक श्री. तानाजी सावंत यांच्याशी याविषयी चर्चा झाली. श्री. सावंत यांनी ‘पार्वती’ आणि ‘पद्मा’ चित्रपटगृहांच्या व्यवस्थापकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. या वेळी झालेल्या चर्चेत श्री. सावंत यांनी ‘रईस’ या चित्रपटाचा एक तरी खेळ बंद करावा, अशी हिंदुत्वनिष्ठांची अपेक्षा असल्याचे सांगितले; मात्र यावर त्या दोन्ही व्यवस्थापकांनी काहीही आश्वासन दिले नाही. या चित्रपटाचे सर्व खेळ दोन्ही चित्रपटगृहांत चालू असल्याचे दिसून आले. (निव्वळ पैशांसाठी पाकचा उदोउदो करणारा चित्रपट प्रसारित करणारे चित्रपटगृहाचे राष्ट्राभिमानशून्य मालक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात