नालासोपारा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
नालासोपारा : बौद्धबहुल म्यानमार देशातून रोहिंग्या मुसलमानांची हकालपट्टी केल्यानंतर अनेक देशांनी त्यांना थारा दिला नसतांना भारतात मात्र त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या जात आहेत. जम्मूतील डोग्राबहुल लोकवस्त्यांतून त्यांचे पुनर्वसन करण्याचा सरकारचा घाट आहे. भविष्यात यांची संख्या वाढल्यास काश्मीरमधून ज्याप्रमाणे काश्मिरी पंडितांना विस्थापित व्हावे लागले होते, त्याप्रमाणे जम्मूमधूनही हिंदूंना हाकलले जाऊ शकते. सरकारच्या या आत्मघातकी निर्णयाचा विरोध करण्यासाठी नालासोपारा पूर्व येथील संतोष भुवन येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी एन्.सी.ई.आर्.टी.चा हिंदुविरोधी आणि राष्ट्रविरोधी अभ्यासक्रम रहित करण्याची मागणी करण्यात आली, तसेच राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने होणार्या राष्ट्रध्वजाच्या अवमानाविषयी जागृती करण्यात आली.
प्रार्थना आणि घोषणा यांनी आंदोलनाला आरंभ करण्यात आला. शासनाच्या हिंदुविरोधी निर्णयाचा निषेध करण्यासाठी आंदोलकांनी हातात फलक घेतले होते. आंदोलन करण्यामागील उद्देश मेगाफोनवरून स्पष्ट करण्यात आला. आंदोलनाला बजरंग सेवा दल, ब्राह्मण सेवा संघ, हिंदु गोवंश रक्षा समिती, योग वेदांत समिती, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल आणि हिंदु जनजागृती समिती या संघटनांचे आणि शिवसेना, तसेच भाजप या पक्षांच्या ८० कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने आंदोलनाची सांगता करण्यात आली.
श्री. सूर्यभान सिंग, बजरंग सेवा दल : पाक आणि बांगलादेश येथून भारतात आलेल्या हिंदूंना कोणीही वाली नाही; मात्र म्यानमारमधून आलेल्या रोहिंग्या मुसलमानांना भारतात स्थान दिले जाते, हे कदापि सहन केले जाणार नाही.
श्री. गुलाब मौर्या, योग वेदांत समिती : प्लास्टिकचे ध्वज, ध्वजाच्या रंगांतील फुगे आणि अन्य उत्पादने यांमुळे राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान लोकांमध्ये जागृती करून आपल्याला रोखायला हवा.
श्री. उमेश दुबे, ब्राह्मण सेवा संघ : राष्ट्रीय सणांच्या दुसर्या दिवशी प्लास्टिकचे राष्ट्रध्वज रस्त्यावर इतस्तत: पडलेले दिसणे म्हणजे राष्ट्रासाठी प्राणांची आहुती देणार्या क्रांतिकारकांचा घोर अपमान आहे. आपण हे रोखले पाहिजे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात