-
रशियात हिंदु धर्माचा प्रसार करत असल्याचा राग !
-
हिंदु धर्माची अपकीर्ती रोखण्यासाठी हिंदूंची स्वाक्षरी मोहीम !
रशिया येथील एक धर्माभिमानी श्री. प्रकाश हे तेथे हिंदु धर्माचा प्रसार करत आहेत. तथापि त्यांना अलेक्झांडर डोरकीन या ख्रिस्ती धार्मिक नेत्याकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत असून श्री. प्रकाश यांना धमकी देण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. या संपूर्ण प्रकाराविषयीची माहिती येथे देत आहोत.
१. रशियात राहून हिंदु धर्मप्रसाराची सेवा करणारे श्री. प्रकाश !
‘मॉस्को (रशिया) वर्ष २०१० च्या जनगणनेनुसार रशियातील हिंदूंची लोकसंख्या १ लाख ४० सहस्र आहे. ही संख्या रशियातील लोकसंख्येच्या केवळ ०.१ टक्का इतकी आहे. येथील हिंदू रशियात आतापर्यंत गुण्यागोविंदाने रहात होते. एक भारतीय वंशाचे नागरिक श्री. प्रकाश त्यांच्या ३ मुलांसह गेली २६ वर्षे रशियात स्थायिक आहेत. श्री. प्रकाश कुठल्याही आर्थिक लाभाविना हिंदु धर्म आणि संस्कृती यांची माहिती देणारी एक संस्था चालवत आहेत. या संस्थेद्वारे हिंदु धर्म आणि योग शास्त्र, तसेच हिंदु तत्त्वज्ञान यांविषयी जिज्ञासा असणार्यांचे प्रबोधन केले जाते.
२. अलेक्झांडर डोरकीन या ख्रिस्ती धार्मिक नेत्याकडून श्री. प्रकाश यांचा छळ !
तथापि काही दिवसांपासून अलेक्झांडर डोरकीन नावाच्या तथाकथित ख्रिस्ती धार्मिक नेत्याने श्री. प्रकाश आणि त्यांच्या कुटुंबाला शारीरिक इजा करण्याच्या धमक्या देऊन छळणे चालू केले आहे. याशिवाय डोरकीन हे संकेतस्थळाच्या माध्यमातून हिंदु धर्माविषयी चुकीची आणि अवमानकारक माहिती देऊन हिंदु धर्माच्या विरोधात मोठ्या प्रमाणात अपप्रचार करत आहेत. डोरेकीन यांनी रशियातील प्रसारमाध्यमांना हाताशी धरून हिंदु धर्माविरुद्ध वार्तापत्रे प्रसिद्ध केली. त्यांनी रशियाच्या ‘रशिया-१’ या सरकारी वृत्तवाहिनीवर १६ डिसेंबर २०१६ या दिवशी २ मिनिटांच्या एका खोट्या वृत्ताची ध्वनीचित्रफीतही प्रसारित केली.
३. श्री. प्रकाश यांनी डोरकीन यांच्या विरोधात दिलेला न्यायालयीन लढा !
हिंदु धर्माविरुद्ध चालवलेल्या अपप्रचाराला आला घालण्यासाठी श्री. प्रकाश यांनी डोरकीन यांच्या संकेतस्थळाविरुद्ध प्रख्यात कायदेपंडित शोटा जोर्गेझ यांच्या साहाय्याने न्यायालयात याचिका दाखल केली. आतापर्यंत डोरकीन यांच्या बाजूने कुणीच साक्षीदार उपलब्ध झाला नाही. परिणामी डोरकीन चांगलेच संतप्त झाले. त्याचा राग त्यांनी श्री. प्रकाश यांच्यावर काढला. त्यांनी श्री. प्रकाश यांच्या घरी भाडोत्री गुंड पाठवून त्यांना धमक्या देणे चालू केले. या याचिकेची सुनावणी अद्याप प्रलंबित आहे.
४. हिंदूंकडून स्वाक्षरी मोहिमेस प्रारंभ : स्वाक्षर्यांचे निवेदन रशिया आणि भारताच्या पंतप्रधानांना पाठवणार !
डोरकीन यांच्याविरुद्ध दाद मागण्यासाठी श्री. प्रकाश यांचे पुत्र श्री. प्रसून प्रकाश यांनी स्वाक्षरी मोहीम चालू केली आहे. स्वाक्षर्यांचे हे निवेदन रशियाचे पंतप्रधान ब्लादिमीर पुतीन, परराष्ट्रमंत्री लाव्हरोव्ह, तसेच भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी अन् परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना पाठवण्यात येणार आहे. तरी या याचिकेवर अधिकाधिक धर्माभिमानी हिंदूंनी स्वाक्षरी करावी, असे आवाहन श्री. प्रसून प्रकाश यांनी केले आहे.’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात