अजेकारू (कर्नाटक) येथे हिंदु धर्मजागृती सभा !
उडुपी (कर्नाटक) : सध्याची युवा पिढी पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्याने ती धर्माचारणापासून दूर जात आहे. हिंदु तरुणी मोठ्या प्रमाणात लव्ह जिहादला बळी पडत आहेत. सर्वच ठिकाणी हिंदूंची दु:स्थिती झाली आहे. तरीही आपल्या देशातील राजकारणी १४ टक्के लोकांच्या मतांसाठी ७९ टक्के लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष करत आहेत. आपल्या देशात मादक पदार्थांची सर्रास विक्री होते. तरुणांनी सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. एकूणच पाश्चात्त्यांचे अंधानुकरण रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अधिवक्ता श्री. राजेश ए.आर्.यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अजेकारू येथील श्रीराम मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजयकुमार, सनातन संस्थेच्या सौ. संगीता प्रभु आणि शिवमोग्गा येथील रणरागिणी शाखेच्या कु. रेवती मोगेर हे मान्यवर उपस्थित होते. सभेचा प्रारंभ शंखनाद आणि श्री गणेशाच्या श्लोकपठणाने झाला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ब्रह्मवृदांनी वेदमंत्रपठण केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. विश्वनाथ नायक यांनी प्रास्ताविक, तर आभारप्रदर्शन श्री. राजेंद्र कुमार यांनी केले. या सभेला अनुमाने ३०० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.
वक्त्यांनी केलेली ओजस्वी भाषणे
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात प्रत्येक हिंदूने सहभागी होणे आवश्यक ! – विजयकुमार, हिंदु जनजागृती समिती
१. भारतात निधर्मीवादाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण आणि हिंदूंवर अन्याय करण्यात येतो. या तथाकथित निधर्मीपणामुळे गेल्या ६८ वर्षांत देशात अनेक समस्या निर्माण झाल्या, तसेच हिंदू तेजोहीन बनले.
२. हिंदुबहुल भारतात हिंदूंच्या उत्सवांच्या वेळी लावण्यात येणार्या ध्वनीक्षेपकांवर निर्बंध आहेत; मात्र प्रतिदिन पहाटे ५ वाजता प्रार्थनास्थळांवरील ध्वनीक्षेपकांवर कोणतेही निर्बंध नाहीत.
३. सध्या सर्वत्र इसिस या आतंकवादी संघटनेचे वारे घोंघावत आहे. आणखी काही वर्षांनी ‘निधर्मी राज्य कि हिंदु राष्ट्र ?’ असा प्रश्न उरणार नसून ‘इस्लामी राज्य कि हिंदु राष्ट्र ?’ असा प्रश्न निर्माण होईल. हे आतंकवादी संकट आपण समजून घेतले पाहिजे. यासाठी समस्त हिंदूंनी संघटित झाले पाहिजे.
४. हिंदूंना स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अनेक संतांनी सांगितल्याप्रमाणे वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे. या कार्यात प्रत्येक हिंदूने सहभागी होणे आवश्यक आहे.
हिंदुत्वनिष्ठ संघटनांवरील अन्यायाच्या विरोधात हिंदूंनी संघटित व्हावे ! – सौ. संगीता प्रभु, सनातन संस्था
खटल्यांचा निकाल लागल्यानंतर केवळ ९ टक्के आरोपींना शिक्षा होते. ९१ टक्के आरोपी निर्दोष सुटतात. म्हणजेच ९१ टक्के निरपराध लोकांना पोलिसांचे अत्याचार सहन करावे लागतात. पोलिसांच्या खोटारडेणामुळे त्यांना अनेक वर्षे कारागृहात रहावे लागते. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनाही असे अनुभव आले आहेत. आज सनातन जात्यात, तर अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना सुपात आहेत; म्हणूनच हिंदुत्वनिष्ठ संघटनांवरील अन्यायाच्या विरोधात हिंदूंनी संघटित झाले पाहिजे.
महिलांनी स्वसंरक्षणाद्वारे स्वत:मध्ये प्रतिकारक्षमता निर्माण करावी ! – कु. रेवती मोगेर, रणरागिणी शाखा
आपल्याला स्वतःसह आपले कुटुंब, घर, गल्ली, गाव, समाज, राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करण्याची आवश्यकता आहे. या सर्वांचे रक्षण झाले, तरच खर्या अर्थाने ‘स्व’चे रक्षण होईल. भारतीय संविधानात प्रत्येक नागरिकाला आपला जीव वाचवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. आज संपूर्ण समाजाला आपल्या मुठीत ठेवणारे गुंड, भ्रष्टाचारी, अपराधी, बलात्कारी आणि धर्मांध यांनी समाजाला वेठीस धरले आहे. शाळा किंवा महाविद्यालये येथे जाणार्या आपल्या मुली सुरक्षित घरी येतील, याची आपल्याला शाश्वती नसते. त्यामुळे कोणीतरी आपले रक्षण करील, यावर महिलांनी अवलंबून रहाणे योग्य नाही. महिलांनी स्वसंरक्षणाद्वारे स्वत:मध्ये प्रतिकारक्षमता निर्माण करणे आवश्यक आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात