तक्रारींची वाढती संख्या पहाता हतबलता येऊन त्याच्या निवारणासाठी देवाचा धावा करणे बरोबरच आहे; मात्र असे करतांना पोलिसांनी नाकर्तेपणा, अकार्यक्षमता हे दोष घालवून स्वतःचे क्रियमाण वापरले, तरच देव त्यांना साहाय्य करेल, हेही तितकेच खरे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात, दैनिक सनातन प्रभात
बेंगळुरू : एकापाठोपाठ एक लैंगिक अत्याचारांच्या तक्रारी प्रविष्ट होत असल्याने हैराण झालेल्या बाणसवाडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी यापुढे लैंगिक अत्याचारांच्या तक्रारी येऊ नयेत, यासाठी पोलीस ठाण्यातच वास्तूदोष होम, सुदर्शन होम आणि शत्रूसंहार याग केला.
२० जानेवारी या दिवशी सकाळी बाणसवाडी पोलीस ठाण्यात हा याग करण्यात आला. (या कृतीमागील हेतूकडे दुर्लक्ष करून पुरो(अधो)गामी, निधर्मी आणि निरीश्वरवादी यांनी थयथयाट केल्यास आश्चर्य ते काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पोलीस ठाण्यात येणार्या संकटाचा नाश व्हावा, हा त्यामागील उद्देश होता.
लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या तक्रारींनी पोलीस हैराण !
१ ते २० जानेवारीपर्यंत या २० दिवसांत या पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारांची ५८ तक्रारी प्रविष्ट झाल्या. (यावरून समाजाचे किती झपाट्याने अधःपतन होत आहे, हेच दिसून येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) केवळ २० दिवसांत बेंगळुरूच्या कोणत्याही पोलीस ठाण्यात प्रविष्ट झालेल्या तक्रारींपेक्षा हा आकडा सर्वाधिक आहे. हे संकट दूर होईल, असे पोलिसांना वाटत नाही. के.आर्. पुरा उपविभाग पोलीस ठाण्यात १० हून अधिक लैंगिक अत्याचारांची प्रकरणे उघडकीस आली असून यातील आरोपींना अटक करेपर्यंत पोलीस कर्मचारी हैराण झाले आहेत. (एखाद्या परिसरात गुन्हे घडतात, याचा अर्थ गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. खाकी वर्दीचा धाक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यामुळे काही ज्येष्ठ मंडळींच्या, तसेच ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार वास्तूदोष, सुदर्शन होम आणि शत्रूसंहार याग करण्यात आला. (अत्याचार वाढण्यामागील मूळ कारण हे समाजाला धर्मशिक्षण न देणे, हे आहे. त्यामुळे गुन्हे न्यून करण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
बाणसवाडी पोलीस ठाण्यातील अधिकारी मुनीकृष्ण यांनी सत्पनीक पूजा केली. प्रसिद्ध देवस्थानांच्या पूजार्यांनी या यागाचे पौरोहित्य केले. शुक्रवारी पहाटे ५ वाजता प्रारंभ झालेली पूजा सकाळी ८.३० वाजता पूर्णाहुतीने पार पडली. पोलीस उपनिरीक्षक कार्यालयाच्या समोर असलेल्या मोठ्या हॉलमध्ये ही पूजा करण्यात आली. होम हवनाचा व्यय (खर्च) मुनीकृष्ण यांनी स्वतः केला. पूजेला सर्व कर्मचारी वर्गाला उपस्थित रहाणे अनिवार्य केले होते.
यागाविषयी माहिती नाही ! – पोलीस उपायुक्त
बाणसवाडी ठाण्यात झालेल्या यागाविषयी मला काहीही महिती नाही. तशी बातमी माझ्यापर्यंत आली नाही, अशी प्रतिक्रिया पूर्व विभागाचे पोलीस उपायुक्त अजय हिलोरी यांनी एका दैनिकाला दिली. मुनीकृष्ण प्रत्येक शुक्रवारी पूजा करतात, मग त्यात विशेष काय आहे ? असे म्हणत हिलोरी यांनी दूरभाष बंद केला. (यज्ञ-याग केला म्हणजे काहीतरी चोरी केली, असे पोलीस अधिकार्यांना का वाटते ? पोलीसदलावरही निधर्मीवादाचा पगडा असल्यामुळेच अशी धार्मिक कृती केली, हे सांगण्यास ते घाबरतात. याला निधर्मी राज्यकर्ते आणि बेगडी पुरोगामी उत्तरदायी आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात