वॉशिंग्टन : सात मुस्लिमबहुल देशातील निर्वासितांना अमेरिकेमध्ये प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा आदेश दिला आहे. शुक्रवारी या संबंधीचा एक नवा आदेश जारी करण्यात आला असून याद्वारे ७ मुस्लिम देशांतील निर्वासितांनी अमेरिकेत येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
कट्टर मुस्लिम दहशतवाद्यांपासून अमेरिकेचा बचाव करण्यास हा निर्णय घेण्यात आला आहे. सीरिया, इराण, इराक, लीबिया, सोमालिया, सुदान, येमेन या सात देशांचा यात समावेश आहे. ‘कट्टर इस्लामिक दहशतवाद्यांना अमेरिकेबाहेर ठेवण्यासाठी हा उपाय असून, केवळ अमेरिकेला पाठिंबा देणा-या, अमेरिकेवर प्रेम करणा-यांचाच स्वीकार करू’, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. ते पेंटागॉन येथे बोलत होते.
राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर पेंटागॉन दौ-यावर असलेल्या ट्रम्प यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली. ‘देशात त्या समस्यांना येऊ देणार नाही, ज्याविरोधात आपले सैनिक परदेशात लढत आहेत’, असेही यावेळी ट्रम्प म्हणाले.
दरम्यान, या निर्णयामुळे किमान ४ महिने तरी या सात देशांतील निर्वासितांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही. कारण पुनर्वसन कार्यक्रमाला १२० दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. शिवाय, ९० दिवसांपर्यंत व्हिसाही दिला जाणार नाही.
स्त्रोत : लोकमत