अहमदाबाद : गुजरातमधील सोमनाथ मंदिर ट्रस्टने केंद्र सरकारच्या सुवर्ण ठेव योजनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विश्वस्तांच्या बैठकीत सुवर्ण ठेव योजनेत गुंतवणुकीविषयी सर्वांचे एकमत झाले आहे. काही दिवसांपुर्वी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराने सुवर्ण ठेव योजनेअंतर्गत सरकारकडे ४० किलो सोने जमा करण्याची घोषणा केली होती.
सध्या मंदिरात शुद्ध सोने; तसेच दागिने स्वरूपात ३५ किलो सोन्याचा साठा आहे. यापैकी वापरात नसलेले सोने सरकारकडे जमा केले जाणार आहे, अशी माहिती सोमनाथ मंदिर देवस्थानचे विश्वस्त पी. के. लाहिरी यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल, भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचाही सोमनाथ मंदिर देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये समावेश आहे. बारा जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे;
तसेच सरकारच्या महत्त्वाकांक्षी सुवर्ण ठेव योजनेला तिरुपती बालाजी मंदिराकडून सर्वाधिक प्रतिसादाची अपेक्षा आहे. गुंतवणूक समितीने परवानगी दिल्यास सरकारच्या सुवर्ण ठेव योजनेत गुंतवणूक करू, अशी माहिती तिरुमला तिरुपती देवस्थान मंडळाने दिली आहे.
संदर्भ : सकाळ