पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचा फतवा
लंडन : ब्रिटनमध्ये अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या; परंतु इंग्रजी भाषा न येणाऱ्या स्थलांतरित महिलांना देशातून हद्दपार केले जाईल, असा फतवा अध्यक्ष डेव्हिड कॅमेरून यांनी जाहीर केला. गेल्या अडीच वर्षांहून अधिक काळ ब्रिटनमध्ये राहणाऱ्या महिलांची आता भाषा-परीक्षा घेतली जाणार असून, यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांनाच ब्रिटनमध्ये राहता येणार आहे.
विवाहानंतर ब्रिटनमध्ये आलेल्या महिलांमधील अनेकांना येथील इंग्रजी ही राष्ट्रभाषा बोलता येत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेत नापास होणाऱ्या महिलांना पुन्हा त्यांच्या मूळ देशी परत पाठविण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली. ज्यांची मुले येथे जन्माला आली अशा महिलांचे काय, त्यांनाही देशाबाहेर काढणार का, असा प्रश्न कॅमेरून यांना विचारला असता त्यांनी असे लोक ब्रिटनमध्ये राहू शकतील की नाही याबाबत खात्री नसल्याचे सांगितले. बीबीसी रेडिओला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
तुम्ही भाषा सुधारण्यासाठी इथे राहू शकता; परंतु त्याचीही खात्री कशी देणार? विचारांती ही थोडी अवघड गोष्ट असली तरी इथे येणारे लोकच याला जबाबदार असल्याचे कॅमेरून म्हणाले. ब्रिटनमध्ये जन्माला आलेल्या आणि एकच पालक असलेल्या मुलांना ब्रिटिश नागरिकत्व दिले जाते, त्यामुळे अशी मुले येथे राहू शकतात; परंतु त्यांच्या मातांना इंग्रजी भाषा येत नसेल तर इथे राहता येणार नाही; परंतु असे नागरिकत्व मिळालेल्या मुलांना त्यांच्या आईसोबत आईच्या मूळ गावीही राहायला जाता येणार नाही, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
विशेषत: स्थलांतरितांमधील महिलांनी इंग्रजी भाषेचे शिक्षण घेण्यासाठी धोरण आखत असलेल्या कॅमेरून सरकारने काही वर्षांपूर्वी स्थलांतरितांसाठीच्या इंग्रजी भाषेच्या अभ्यासक्रमासाठीच्या निधीत कपात केली होती. अर्थव्यवस्था तुटीमध्ये असल्याने अशा स्वरूपाचा निधी कपात करण्याचा निर्णय घ्यावा लागला, अशी कबुलीही पंतप्रधान कॅमेरॉन यांनी या वेळी दिली.
ब्रिटनमधील स्थलांतरित मुस्लिम महिला हे या नव्या धोरणाचे लक्ष्य आहेत. इंग्रजी येत नसल्याने अशा महिलांचा गट समाजापासून तुटून वेगळा राहतो, असे निरीक्षण सरकारी यंत्रणांनी नोंदविले आहे. सरकारच्या दाव्यानुसार, देशातील जवळपास १,९०,००० मुस्लिम महिलांचे इंग्रजीचे ज्ञान कच्चे आहे. शिवाय, अंदाजे ३८,००० महिला अजिबात इंग्रजी बोलू शकत नाहीत.
तुम्ही येथील भाषा बोलू शकत नसाल, तर तुमच्या संधी खूपच कमी होतात. ज्यांना आमच्या देशात येण्याची इच्छा आहे, त्यांना सांगू इच्छितो की, इंग्रजी शिकणे अनिवार्य आहे.