Menu Close

मुस्लिमांचे तुष्टीकरण थांबवण्याचे विहिंपचे राजकीय पक्षांना आवाहन

मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचे धोरण ‘न संपणारे’ असून त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे, असे सांगून अशा प्रकारचे तुष्टीकरण करणे थांबवावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेने राजकीय पक्षांना केले आहे. देशातील मुस्लीम लोकसंख्या हिंदूंपेक्षा अधिक वेगाने वाढत असल्यामुळे लोकसंख्येबाबत समान धोरण निश्चित केले जाण्यावरही संघटनेने भर दिला आहे.

मुस्लिमांच्या तुष्टीकरणामुळे देशाचे नुकसान होत आहे. हा प्रकार अंत नसणारा असून ‘तुष्टीकरणाच्या राक्षसाचे’ मुळीच समाधान केले जाऊ शकत नाही. त्यामुळे मुस्लीम तुष्टीकरणाचे ‘धोरण’ राजकीय पक्षांनी थांबवावे, असे आवाहन विहिंपचे सहसरचिटणीस सुरेंद्र कुमार जैन यांनी केले.विहिंपने आयोजित केलेल्या बजरंग दलाच्या दोन दिवसांच्या अखिल भारतीय बैठकीच्या समारोपाच्या दिवशी जैन पत्रकारांशी बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयानेही समान लोकसंख्या धोरणाच्या बाजूने मतप्रदर्शन केले असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. मुस्लीम लोकसंख्येचा एकूण जननक्षमता दर (टोटल फर्टिलिटी रेट- टीएफआर) दर दिवशी वाढत असून, आता हिंदू धोकादायक स्तरापर्यंत कमी झाले आहेत. हिंदूंची संख्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्क्यांहून कमी झाली आहे.

ही गोष्ट मानसिकदृष्टय़ा निराश करणारी आहे, असे जैन म्हणाले. देशातील मदरशांवर बंदी घातली जावी, अशी मागणी करताना जैन म्हणाले की, पाकिस्तान मदरशांवर बंदी घालत असून फ्रान्स, जर्मनी व रशिया यांच्यासारख्या देशांनीही त्यांच्यावर बंदी आणली आहे. ही बंदी म्हणजे इस्लामविरुद्ध युद्ध नसून, जिहादच्या वाढत्या प्रवृत्तीविरुद्धचा हा लढा आहे.

संदर्भ : लोकसत्ता

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *