उज्जैन येथे हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु महासभेचे प्रशासनाला निवेदन
हिंदुबहुल देशात अशी मागणी करावी लागते, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !
उज्जैन : धार (मध्यप्रदेश) येथील प्राचीन श्री सरस्वती मंदिर अर्थात् भोजशाळेत हिंदूंना केवळ वसंतपंचमीच्या दिवशीच (यंदाच्या वर्षी १ फेब्रुवारी या दिवशी) पूजा करण्याचा अधिकार आहे. वर्षातून केवळ एकदाच पूजेचा अधिकार मिळणे, ही हिंदूंच्या धार्मिक अधिकारांवरील गदा आहे. केंद्र आणि राज्य या दोन्ही ठिकाणी सत्तेवर असलेल्या भाजप शासनाने प्राचीन सरस्वती मंदिर पूजेसाठी कायमस्वरूपी उपलब्ध करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु महासभा यांनी ३० जानेवारी या दिवशी येथील तहसीलदार ममता पटेल यांना एका निवेदनाद्वारे केली.
या वेळी हिंदु शौर्य जागरण अभियानचे श्री. अरविंदजी जैन, श्री. कैलास शर्मा, हिंदु महासभेचे प्रदेश प्रवक्ता श्री. मनीष चौहान, प्रदेश उपाध्यक्ष श्री. नंदकिशोरजी पाटीदार, दबंग हिंदु सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. लोकेश शर्मा, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. राज वीर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया, श्री. मनोज पटेल, श्री. सागर सिंह बख्तरिया यांच्यासह २५ हून अधिक धर्मप्रेमी हिंदू उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने लंडनस्थित श्री सरस्वतीदेवीची मूळ मूर्ती पुन्हा भारतात आणून तिची भोजशाळेत विधीपूर्वक पुनर्प्रतिष्ठापना करावी. आतापर्यंत मंदिरात पूजा करण्याच्या न्याय मागणीसाठी हिंदूंनी केलेल्या आंदोलनात जे संत-महंत आणि हिंदु संघटनांचे कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे प्रविष्ट करण्यात आले असतील, ते निरस्त करावेत.
अन्य एक निवेदन देण्यासाठी आलेला वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा गट भोजशाळेच्या संदर्भातील विषय ऐकून तो त्या संदर्भातील निवेदन देण्यासाठीही आला.
क्षणचित्र : या वेळी सर्वांनी उत्स्फूर्त घोषणा देत भोजशाळा हिंदूंचीच असल्याच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात