पुणे येथे आंतरधर्मीय समन्वय या विषयावर राष्ट्रीय गोलमेज परिषद
पुणे : प्रभु श्रीरामचंद्रांचा आदर्श घेऊन सर्वांनी आपसातील वैर विसरून एक व्हायला हवे. भारतच विश्वात शांती आणि एकता प्रस्थापित करेल. मानवता कमी झाल्याने प्रत्येक देश अडचणींना तोंड देत आहे. या पार्श्वभूमीवर विश्वधर्मी श्रीराम मानवता भवन देशासाठी आदर्श असेल, असे प्रतिपादन स्वामी गोविंददेवगिरी (पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास) यांनी केले. ३० जानेवारी या दिवशी येथील एम्आयटी महाविद्यालयामध्ये आंतरधर्मीय समन्वय या विषयावरील राष्ट्रीय गोलमेज परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी एम्आयटीचे डॉ. विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून प्रस्तावित असलेल्या विश्वधर्मी श्रीराम मानवता भवनाच्या प्रतिकृतीचे लोकार्पण करण्यात आले.
या प्रसंगी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर, माजी केंद्रीयमंत्री डॉ. आरिफ महंमद खान, ज्येष्ठ पत्रकार
डॉ. वेद प्रताप वैदिक, रामजन्मभूमी न्यासाचे सदस्य डॉ. राम विलास वेदांती, माजी सनदी अधिकारी श्री. अविनाश धर्माधिकारी, मुसलमान विचारवंत सय्यद कल्बे रशीद रिझवी आदी मान्यवर उपस्थित होते. सनातन संस्थेचे सर्वश्री प्रवीण नाईक, महेश पाठक, सुरेंद्र वाटवे आणि कु. क्रांती पेटकर हे कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.
१. डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, वाढत्या राष्ट्रवादाच्या वातावरणामध्ये वैश्विक विचारांचा अंगिकार करायला हवा. विश्वातील सर्व धर्म समांतर मार्गाने चालत असून ते कुठेच एक होतांना दिसून येत नाहीत. मानवता भवनाच्या माध्यमातून हे स्वप्न सत्यात उतरू शकेल. भारतीय संस्कृतीच वसुधैव कुटुम्बकम् असा विचार मांडते.
२. अनेक वर्षांपासून चालू असलेले अयोध्येतील वादंगाच्या पार्श्वभूमीवर विश्वधर्मी श्रीराम मानवता भवन हा समाधानकारक उपाय असल्याची भावना डॉ. भटकर यांनी व्यक्त केली.
३. श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी मंदिरे ही शिक्षणाची केंद्रे व्हायला हवीत. भारतीय संस्कृती ही सर्वसमावेशक आणि सहिष्णू आहे, असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी नालंदा विश्वविद्यालयाच्या कुलपतीपदी निवड झाल्यानिमित्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना सनातनच्या वतीने अध्यात्म आणि विज्ञान हा ग्रंथ भेट देण्यात आला.
प्रस्तावित विश्वधर्मी श्रीराम मानवता भवनामध्ये सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांचा समावेश
प्रस्तावित विश्वधर्मी श्रीराम मानवता भवनाचा मुख्य व्यास ३५० फूटांचा असून या भवनाच्या सभोवताली हिंदु, मुसलमान, ख्रिस्ती, बौद्ध, जैन, पारशी, शीख या धर्मियांसाठी प्रार्थनास्थळे प्रस्तावित केली आहेत. (मुसलमानांचे सर्वोच्च धार्मिक स्थळ असलेली मक्का किंवा ख्रिस्त्यांचे मुख्य धार्मिक स्थळ असलेले व्हॅटिकन या ठिकाणी हिंदूंचे मंदिर बांधले जाऊ शकते का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात