देहली येथील जंतरमंतरवर राष्ट्रीय हिंदू आंदोलन
नवी देहली : म्यानमार येथून विस्थापित झालेल्या रोहिंग्या मुसलमानांना भारतात थारा देऊ नये, मुसलमान कर्मचार्यांना नमाजपठण करण्यासाठी कार्यालयीन वेळेत ९० मिनिटांचा वेळ देण्याचा निर्णय उत्तराखंड सरकारने रहित करावा आणि एन्.सी.ई.आर्.टी. च्या १२ वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात देण्यात आलेली गुजरातच्या दंगलीविषयीची मुसलमानधार्जिणी माहिती काढून टाकावी, या मागण्यांसाठी जंतरमंतरवर येथे नुकतेच राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वैदिक उपासना पीठ, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यकर्त्यांसह अन्य धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते.
रोहिंग्या मुसलमानांना आसरा देणे देशाच्या सुरक्षेसाठी गंभीर ! – श्री रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती
भारत एक सार्वभौम राष्ट्र असतांना आणि आमच्या सीमा पूर्णतः सुरक्षित असतांना कोणत्याही ‘व्हिसा’ आणि ‘पासपोर्ट’ यांविना हे मुसलमान या देशात आले कसे, याचा शोध घेतला पाहिजे. रोहिंग्या मुसलमानांनी ३ वर्षांपूर्वी मुंबई येथील आझाद मैदानावर दंगल केली होती. अशा लोकांना या देशात आसरा देणे सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहे. जर एन्.सी.ई.आर्.टी. च्या पाठ्यपुस्तकातून गुजरात दंगलीविषयी माहिती दिली जाते, तर बंगालमधील मालडा आणि धुलागड येथे हिंदूंच्या विरोधात घडलेल्या दंगलीचा इतिहास का शिकवला जात नाही ?
हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर उतरून विरोध केला पाहिजे ! – धर्माभिमानी श्री. राजीव डोग्रा
भारतात म्यानमार येथील रोहिंग्या मुसलमानांना सामावून घेतले जाते; परंतु शरणार्थी हिंदूंना कुठेच स्थान दिले जात नाही. केवळ ‘फेसबूक’ आणि ‘व्हॉट्स अॅप’ यांवर अशा वृत्तांना ‘लाईक’ केल्याने काही होणार नाही, तर हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर उतरून विरोध केला पाहिजे.
क्षणचित्र
प.पू. भक्तराज महाराज यांनी वापरलेल्या डफलीच्या वापरामुळे वातावरणात चैतन्य पसरत असल्याचे जाणवणे
या आंदोलनामध्ये घोषणा देण्यासाठी सनातन संस्थेचे प्रेरणास्थान, तसेच सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे सद्गुरु प.पू. भक्तराज महाराज यांनी वापरलेल्या डफलीचा वापर करण्यात आला. या डफलीच्या आवाजामुळे वातावरणात चैतन्य पसरत असल्याचे सर्वांना जाणवत होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात