Menu Close

महाराष्ट्रात व्याख्याने, क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन आणि संपूर्ण वन्दे मातरम् या माध्यमांतून राष्ट्रजागृती !

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ चळवळ

क्रांतिकारकांच्या बलिदानातून साकारलेल्या स्वतंत्र भारताचा ६८ वा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीला देशभर साजरा झाला. सध्या शालेय अभ्यासक्रमांतून राष्ट्रप्रेमाचे धडे, क्रांतिकारकांचे चरित्र शिकवले जात नसल्याने विद्यार्थ्यांमधील राष्ट्रीयत्वाची भावना दुर्बळ झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून कागदी राष्ट्रध्वज काही वेळातच रस्त्यावर इतस्तत: पडलेले आढळतात. ज्या राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, कारावास भोगला, त्या राष्ट्रध्वजाची अवहेलना उघड्या डोळ्यांनी पहावी लागते. आपल्या राष्ट्रीय प्रतिकांविषयी विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये आदरभाव निर्माण व्हावा आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम निर्माण होऊन राष्ट्रावरील प्रत्येक लहान-मोठ्या संकटाला तोंड देण्याचे धैर्य निर्माण व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समिती मागील १३ वर्षांपासून राष्ट्रध्वजाचा मान राखा ! ही चळवळ राबवत आहे. २६ जानेवारीला ही मोहीम व्यापक स्तरावर राबवण्यात आली. त्याविषयीचा वृत्तांत येथे देत आहोत.

फ्लेक्स फलकांविषयी सांगतांना श्री. प्रसाद वडके

१. मुलुंड येथे प्रबोधनानंतर २०० विद्यार्थ्यांनी आम्ही राष्ट्रध्वज खाली पडू देणार नाही आणि रस्त्यांवर पडलेले राष्ट्रध्वज उचलून गोळा करू, असे आश्‍वासन दिले. एका इमारतीत सत्यनारायण महापूजेनिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रजागृतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्याचा ५० नागरिकांनी लाभ घेतला.

२. विक्रोळी येथे नॅशनल हायस्कूलमध्ये राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासह स्वतःत स्वभाषाभिमान निर्माण होण्यासाठी दैनंदिन संभाषणातील परकीय शब्दांचा वापर कसा टाळावा, याविषयी २५० मुलांचे प्रबोधन करण्यात आले.

३. भांडुप येथील विद्याधीराज शाळेत प्रवचनानंतर उपमुख्याध्यापकांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची प्रशंसा करून शाळेत अन्य उपक्रम राबवण्याचीही अनुमती दिली. एका शिकवणीवर्गातील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याचे आश्‍वासन दिले. एका ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये झेंडावंदनानंतर घेण्यात आलेल्या व्याख्यानाचा मंडळातील ५० जणांनी लाभ घेतला. एका मंडळाच्या सूचना फलकावर नियमितपणे राष्ट्र आणि धर्मविषयक लिखाण करणारे समितीचे डॉ. लक्ष्मण जठार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

४. कुर्ला येथे ३ सहस्र विद्यार्थी आणि घाटकोपर येथे २५० विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला. पवई येथेही २ शाळांमध्ये व्याख्यान घेण्यात आले.

५. दादर येथे समितीच्या व्याख्यानानंतर उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे वन्दे मातरम्च्या घोषणा दिल्या.

६. चुनाभट्टी येथे मार्गदर्शनातंतर स्थानिक युवकांनी मंडळात धर्मशिक्षणवर्ग घेण्याची मागणी केली आहे.

७. वरळी येथे एका इमारतीत व्याख्यानाच्या वेळी १०० नागरिक उपस्थित होते. जे.के. स्पोर्टस क्लब मंडळाच्या ध्वजारोहणाच्या वेळी व्याख्यान घेण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष श्री. सुभाष चव्हाण, तसेच सर्वश्री गणेश पाटील आणि तुकाराम मोकल यांनी मंडळामध्ये क्रांतीकारकांचे फ्लेक्स लावण्याची आणि नियमित धर्मशिक्षणवर्ग घेण्याची मागणी केली.

८. जोगेश्वरी येथील मंडळातील लोकांनी व्याख्यानानंतर वक्त्यांची भेट घेऊन महत्त्वाची माहिती मिळाल्याने समाधान व्यक्त केले.

९. सानपाडा येथे एका शाळेत, तर ३ इमारतींमध्ये व्याख्यान घेण्यात आले. कोपरखैरणे येथे २ शाळांमधील ७०० विद्यार्थ्यांनी व्याख्यानाचा लाभ घेतला.

१०. बोरिवली रेल्वे स्थानकावर क्रांतिकारकांचे जीवनचरित्र दर्शवणारे सचित्र फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले.
मुंबई जिल्ह्यात महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वजाचा मान राखण्याच्या दृष्टीने ४५० भित्तीपत्रके लावण्यात आली, तसेच १ सहस्र हस्तपत्रकांचे वाटप करण्यात आले.

११. डोंबिवली, ठाणे आणि अंबरनाथ येथील शाळांमध्ये क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले. १ सहस्रांहून अधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला.

१२. जळगाव येथील शाळांमध्ये श्री. सचिन वैद्य, सौ. नंदा नागणे, सौ. आरती कोमटी, श्री. प्रीतम पाटील, कु. तेजस्विनी तांबट, सौ. अवनी शिंदे यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमाचा लाभ १ सहस्र ५०० विद्यार्थ्यांनी घेतला.

१३. भांडुप (पश्‍चिम) येथील शिवदर्शन सेवा मंडळातील कार्यकत्यांनी आतापर्यंत संपूर्ण वन्दे मातरम् न ऐकल्याची खंत व्यक्त करून ‘केवळ हिंदु जनजागृती समितीमुळे आम्हाला आज संपूर्ण वन्दे मातरम् समजले’, असे सांगितले.

सिंहगड (पुणे) येथे आगळ्या वेगळ्या पद्धतीने राबवली मोहीम

सिंहगडावर सकाळी ७.३० वाजता महसूल विभागाचे मंडलाधिकारी शेखर शिंदे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडले. समितीचे श्री. प्रवीण नाईक यांनी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ याविषयी उपस्थित ७० हून अधिक जणांना मार्गदर्शन केले. त्यानंतर ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण – काळाची आवश्यकता’ या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले.

गडावर राष्ट्रध्वज प्रबोधन फेरी काढण्यात आली. फेरी पाहून अनेकांनी ‘भारतमाता की जय’ यांसह अन्य घोषणाही उत्स्फूर्तपणे दिल्या. समितीच्या कार्यकर्त्यांनी सिंहगडावरील अन्य २ ठिकाणी पथनाट्य सादर केले. त्याला अनुक्रमे ७० आणि ८० उपस्थिती होती. या वेळी क्रांतिकारकांचे प्रदर्शन, ग्रंथ आणि सात्त्विक वस्तूंचे प्रदर्शनही लावण्यात आले होते. प्रदर्शनाला १ सहस्रहून अधिक जणांनी भेट दिली. राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने गडावर ‘स्वच्छता अभियान’ राबवण्यात आले. प्रबोधन फेरीमध्ये प्रा. सुनील मराठे हे जिज्ञासू आपणहून सहभागी झाले.

येथे करण्यात आले संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचे अर्थासह गायन !

विद्याधीराज शाळा, भांडुप (पूर्व); विद्यार्थी अभ्यासवर्ग शिकवणी, भांडुप (पश्‍चिम); सह्याद्री नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, भांडुप (पश्‍चिम); शिवदर्शन सेवा मंडळ, भांडुप (पश्‍चिम); भवानीमाता को.ऑपरेटीव्ह हाउसिंग सोसायटी, ना.म.जोशी मार्ग, वरळी; गुणिना सोसायटी, पाम बीच मार्ग, सानपाडा; आपूर्ती सोसायटी, पाम बीच मार्ग, सानपाडा; भंडारआळी नाका, सोपार गाव, नालासोपारा

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *