संभाजीनगर (आैरंगाबाद) : एकतर्फी प्रेमातून मिनाज सिराज काजी (२१, रा. अब्रार कॉलनी) या तरुणाने मंगळवारी भरदुपारी मुलीच्या आईवर चाकूहल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला; परंतु वेळीच परिसरातील नागरिक मदतीला धावून आल्याने महिलेला तत्काळ घाटीत दाखल करण्यात आले. चार महिन्यांपासून गुन्हेगार अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत होता. तिच्या घरच्यांनी त्याला समजावून सांगितले. यापुढे तिच्याशी बोलण्यास मनाई केल्याचा राग धरून त्याने मुलीच्या आईवरच हल्ला केला.
पंधरा वर्षीय मुलगी परिसरातीलच शाळेत शिक्षण घेते, तर आरोपीसुद्धा याच परिसरात राहतो. चार ते पाच महिन्यांपासून मुलगी शाळेतून घरी निघाल्यावर तो तिचा पाठलाग करत होता. तसेच रस्त्यावर एकतर्फी प्रेम व्यक्त करत छेड काढून तिला धमकी देत होता. हा प्रकार मुलीने घरी सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तरुणाला तिच्याशी बोलण्यास मज्जाव केला. काही दिवसांपासून मुलीच्या घरच्यांनी तिला घराबाहेर निघण्यास मनाई केली. त्यामुळे मिनाजने ३१ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता मुलीचे घर गाठले. तिची आई किराणा दुकानात बसलेली होती. आरोपीने तुम्ही तुमच्या मुलीला माझ्यासोबत का बाेलू देत नाहीत, फार बंधन लावता का ? असे म्हणत त्याने चाकूचा हल्ला केला. सुरुवातीला गालावर नंतर पोटावर वार केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. सहा. पोलिस आयुक्त बाखरे यांनी घटनास्थळी भेट दिली. मिनाजला अटक करून न्यायालयात हजर केले. त्याच्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात कलम ३०७, ३५४ ड, ५०६ बाल लैंगिक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याचे उपनिरीक्षक एस. एस. खरात यांनी सांगितले.
स्त्रोत : दिव्य मराठी