जळगाव : महिलांची सद्यस्थिती चिंताजनक असून प्रतिदिन होणारे अत्याचार, विनयभंग, बलात्कार यांनी आज परिसीमा गाठली आहे. यासाठी महिला सक्षमीकरणाची आवश्यकता असून महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे ही काळाची आवश्यकता आहे, असे मत शहरातील नाभिक महिला मंडळ आयोजित स्नेह मेळाव्यात बोलतांना हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी केले.
३० जानेवारी या दिवशी नाभिक महिला मंडळाच्या वतीने स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कु. रागेश्री देशपांडे म्हणाल्या की, आपण आपल्या मुलींवर धर्माचे संस्कार केल्यास त्या कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणार नाहीत. कुंकू लावणे, बांगड्या घालणे, वेणी किंवा अंबाडा घालणे आणि भारतीय पोशाख परिधान करणे आदी धर्माचरण केले पाहिजे. युवतींनी धर्माचरण केल्यास धर्मांध छेड काढण्याअगोदर ५ वेळा विचार करतील. मुली आणि महिला यांनी धर्माधांच्या कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सक्षम झाले पाहिजे.
त्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला अध्यक्षा सौ. आशा तळेले यांनी भारतीय संस्कृतीचा आदर करून आपल्या पाल्यांवर योग्य संस्कार असले पाहिजेत, तसेच हिंदुु धर्मात स्त्रीला देवी मानले जाते. या देवीचा आदर करून स्त्रीभ्रूण हत्येसारखे प्रकार बंद झाले पाहिजेत त्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन हे रोखायला हवे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. या कार्यक्रमाला २५० हून अधिक महिला उपस्थित होत्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात