पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या घोटाळ्याचे प्रकरण
मुंबई : ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’च्या सदस्यांची नेमणूक राज्य शासन करत असले, तरी यावर राज्य शासनाचा अथवा कोणाचाच अंकुश नसल्याने देवस्थानांच्या कारभारात कित्येक गैरकारभार आणि भ्रष्टाचार होत आहेत. या प्रकरणी जानेवारी २०१५ पासून हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्ववादी संघटनांची आंदोलने अजूनही चालू आहेत. या आंदोलनांचा परिणाम म्हणून शासनाने या समितीच्या कारभाराची ‘राज्य गुन्हे अन्वेषण यंत्रणे’द्वारे (सीआयडी) चौकशी आरंभली. तरी अद्याप कारभार मात्र जुन्याच विश्वस्तांच्या हाती आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्यामुळे हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर येथील प्रतिनिधी श्री. मधुकर नाझरे, श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. बाबासाहेब भोपळे यांनी सह-धर्मादाय आयुक्त, कोल्हापूर यांचेसमोर ‘मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियमा’च्या (Bombay Public Trust Act) तरतुदींखाली सदर सदस्यांना काढून टाकावे, यासाठी अर्ज प्रविष्ट केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन सह-धर्मादाय आयुक्तांनी जिल्हाधिकार्यांसह सर्व विश्वस्तांना नोटीस पाठवली आहे. गेले वर्षभर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री. अमित सैनी हे ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’चे अध्यक्ष म्हणून कारभार पहात आहेत. श्री. सैनी यांनाही या प्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे.
या संदर्भात श्री. मधुकर नाझरे म्हणाले, ‘‘ज्यांनी देवस्थानचे नुकसान केले, ज्यांच्या विरोधात पोलीस चौकशी चालू आहे, त्यांनीच विश्वस्त म्हणून कारभार पहावा, हे चुकीचे आहे. यासाठी आम्ही ही याचिका प्रविष्ट केली आहे.’’
श्री. शिवानंद स्वामी म्हणाले, ‘‘यापूर्वी मी इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला होता. आता त्यांच्यावर कारवाई चालू आहे. आता मी देवस्थानांतील भ्रष्टाचाराविरोधात लढणार आहे.’’ श्री. बाबासाहेब भोपळे म्हणाले, ‘‘मंदिरांतील घोटाळ्यांविषयी आम्ही वेळोवेळी अन् अनेक बाबींविषयी शासनाला जाणीव करून दिली आहे.’’
हिंदूंच्या देवळांमध्ये भ्रष्टाचार करणार्यांना आम्ही सोडणार नाही ! – अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर
हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर या संदर्भात म्हणाले, ‘‘कोणीही यावे आणि भ्रष्टाचार करून जावा, अशी परिस्थिती शासनाच्या कह्यात असणार्या मंदिरांची झाली आहे.
यापूर्वी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात भक्तांनी केलेले दान राजकारण्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी वळवले. शिर्डी येथील श्री साई संस्थानचा भ्रष्टाचार अनेकदा उघडकीस आला आहे.
हिंदु विधीज्ञ परिषदेने पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गैरकारभार बाहेर काढून त्या प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली, तुळजापूरच्या श्री भवानी मंदिरातील घोटाळ्याची ‘सीबीआय’ चौकशी व्हावी, यासाठी हिंदु विधीज्ञ परिषद उच्च न्यायालयात लढा देत आहेत.
हिंदूंच्या मंदिरात भ्रष्टाचार करणार्यांना आम्ही सोडणार नाही, यासाठी हिंदु विधीज्ञ परिषद विनामूल्य खटले लढणार आहे.’’
‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’च्या घोटाळ्यांमधील ठळक सूत्रे : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे रॉयल्टी उत्पन्न येत नसल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे, लेखापरीक्षकांच्या अंदाजानुसार वर्ष २००७ च्या शेवटास ही रक्कम २ ते ३ कोटींच्या घरात होती. देवीला अर्पण केलेल्या साड्यांचा अपहार करण्यात आल्याची शक्यता आहे. अर्पण पेटीत आलेल्या सोने-चांदी अशा दागिन्यांची नोंदच रजिस्टरमध्ये होत नाही. श्रीमहालक्ष्मी देवीसाठी केलेल्या चांदीच्या रथात घोटाळा, मंदिर परिसरात घातलेल्या फरशीमध्ये घोटाळे, प्रसाद बनवण्याच्या टेंडरमध्ये घोटाळे, सहस्रो एकर जमीनींचा घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांचे आरोप हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात