सुनील जोशी हत्या प्रकरणात निर्दोष सुटल्यानंतर साध्वीजींची प्रतिक्रिया
भोपाळ (मध्यप्रदेश) : एक राष्ट्रवादी दुसर्या राष्ट्रवाद्याची हत्या करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी व्यक्त केली. संघप्रचारक सुनील जोशी यांच्या हत्येच्या प्रकरणातून देवास न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह आणि अन्य ७ जणांना निर्दोष मुक्त केले. त्या वेळी साध्वी प्रज्ञासिंह यांचे नातेवाईक भगवान झा यांनी साध्वीजींची भेट घेतली असता त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे झा यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला सांगितले. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असणार्या साध्वीजी सध्या येथे उपचारासाठी आल्या आहेत; मात्र न्यायालयाच्या निकालाच्या वेळी त्या तेथे उपस्थित राहू शकल्या नाहीत. सुनील जोशी हत्या प्रकरणातही जामीन मिळलेच, अशी साध्वींना निश्चिती होती, असेही झा यांनी सांगितले.
साध्वी प्रज्ञासिंह यांचे नातेवाईक म्हणाले, ‘‘मालेगाव बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञासिंह यांचा खरोखरच हात असता, तर एव्हाना त्यांना शिक्षा झाली असती. त्यांना केवळ अडकवण्याचे काम करण्यात आले. मालेगाव प्रकरणात ३ अन्वेषण यंत्रणांना साध्वींविरुद्ध कुठलाही पुरावा मिळाला नाही. या प्रकरणी ७ फेब्रुवारीला सुनावणी आहे.’’
पोलीस आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा यांनी पूर्वग्रह बाळगून शिथिलतेने कारवाई केली !
साध्वी प्रज्ञासिंह यांची निर्दोष मुक्तता करतांना न्यायालयाने निकालात म्हटले आहे की, पोलीस आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्आयए) यांनी या प्रकरणात पूर्वग्रह बाळगून शिथिलतेने कारवाई केली. सुनील जोशी हत्या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह हर्षद सोलंकी, वासुदेव परमार, रामचरण पटेल, आनंदराज कटारिया, लोकेश शर्मा, राजेंद्र चौधरी आणि जीतेंद्र शर्मा अशी निर्दोष मुक्त करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात