हडपसर (पुणे) येथील मोहसीन शेख हत्या प्रकरण
मुंबई : पुण्यातील हडपसर भागातील अभियंता मोहसीन शेख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी हिंदु राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांच्या विरोधातील आरोपपत्राची प्रत आणि सगळे प्रतिकूल पुरावे सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. देसाई यांच्यावर ठेवण्यात आलेले हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याचे आरोप रहित करण्याची मागणी करणारी याचिका कनिष्ठ न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्या विरोधात देसाई यांनी उच्च न्यायालयात ही याचिका केली आहे. १ फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती ए.एम्. बदर यांनी राज्य सरकारला हे आदेश दिले आहेत.
देसाई यांनी या याचिकेत म्हटले आहे की, शेख याच्या हत्येच्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, तसेच आरोपपत्रात केवळ ४ वेळाच माझ्या नावाचा उल्लेख झालेला आहे. त्यामुळे माझ्या या प्रकरणी आरोपी करण्यात आले आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी सांगणारी भाषणे दिली आहेत; मात्र ही भाषणे जानेवारी आणि मार्च २०१४ मध्ये देण्यात आली होती. त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही आणि शेख याची हत्या जूनमध्ये झाली होती. त्याशिवाय ‘घटनास्थळी मी उपस्थित होतो अथवा अन्य आरोपींच्या संपर्कात होतो’, हा दावा खुद्द पोलिसांनीही केलेला नाही. तसेच मी शेख याला ओळखतही नव्हतो. त्यामुळे या प्रकरणी मी पूर्णपणे निर्दोष असून आपल्याला यात गोवण्यात आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात