Menu Close

घुसखोरी रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे !

सोलापूर येथील सोनअंकुर या अवैध पशुवधगृहात काम करणार्‍या दोन बांगलादेशी घुसखोरांना नुकतीच अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या रब्बी सिकंदर या बांगलादेशी घुसखोराचे कसून अन्वेषण करतांना तो अवैध मार्गाने भारतात घुसखोरी करत सोलापूरला आला, हे उघड झाले. बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीचे हे पहिले प्रकरण निश्‍चितच नाही; पण वारंवार असे प्रकार निदर्शनास येतात; म्हणून ते नित्याचेच समजून दुर्लक्षिण्याजोगेही नाही. किंबहुना ‘देशाच्या अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेला बाह्य शक्तींचा एक धोका’ या दृष्टीकोनातून हे अधिकच चिंताजनक आहे.

यातून अनेक प्रश्‍न डोकावतात. असे अवैधरित्या घुसखोर भारतात प्रवेश करून पुढे देशभर संचार कसे करू शकतात ? त्यांना आर्थिक पाठबळ कोण देते ? त्यांना विविध प्रकारे पाठिंबा असल्याशिवाय ते भारतातील उद्योगात चाकरी कशी करू शकतात ? देशाच्या अंतर्गत, तसेच सीमेवरील कायदा आणि सुव्यवस्था किती गलथान झाली आहे, असे कोणाला वाटल्यास चुकीचे काय ? महत्त्वाचे म्हणजे असे घुसखोर वारंवार पोलिसांच्या हाती लागूनही त्यांच्यावर कठोर कारवाई का होत नाही आणि जरी झाली, तरी घुसखोरी कशी होते, अशा अनेक प्रश्‍नांनी सर्वसामान्य नागरिकांच्या मनात एक भय उत्पन्न केले आहे. या सर्वांतून माझ्यावर कधी कोणते संकट कोसळेल, याची चिंता सर्वसामान्य माणसाला लागलेली असते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इंग्रजांनीही आपले हात-पाय पसरायला आरंभ केला होता. हे व्यापाराच्या निमित्ताने आलेले घुसखोर पुढे डोईजड होणार आहेत, हे महाराजांनी वेळीच ओळखले होते आणि आपले सागरी आरमार सिद्ध केले होते. दुर्दैवाने ही दूरदृष्टी, जनहिताची कळकळ आणि राजकीय मुत्सद्देपणा आजच्या शासनकर्त्यांमध्ये आढळतच नाही. अशा घुसखोरांना राजकीय पाठबळ मिळत असल्याशिवाय ते असे धाडस करूच शकणार नाहीत, असे कुणाला वाटल्यास चुकीचे ठरू नये. अशा घुसखोरांना शासन करण्याचे धारिष्ट्य दाखवणे तर दूरच; पण मताच्या हव्यासापायी त्यांची अवैधरित्या घरे वसवून देणारे राजकारणीही आहेत.

आजपर्यंत अनेक परकीय आक्रमकांनी या भूमीवर आक्रमण करून संस्कृतीचा र्‍हास करण्याचा प्रयत्न केला. त्याचाच परिणाम म्हणून अशा नतद्रष्ट आणि स्वार्थी राजकारण्यांना आपण निवडून देत आहोत. आज भारताच्या सीमा कोणत्याही बाजूने सुरक्षित नाहीत. अगदी देशांतर्गत धर्मांध, सागरी आणि हिमालयीन भागातूनही भारताच्या सुरक्षेला धोका आहे. असे असतांना भारताला अगदी नजीकच्या भविष्यातच परत परकीय आक्रमणाला सामोरे जावे लागेल, हे सांगायला कोणा भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही. आज आपण निवडून दिलेला उमेदवार हा राष्ट्रहित जपणारा आहे कि नाही, याचा विचार प्रत्येक मतदाराने केला पाहिजे. देशाच्या सुरक्षेचे तीनतेरा वाजलेले पाहिल्यावर नीती आणि धर्म यांची चाड असणारे शासनकर्ते मिळवण्यासाठी देशहिताची कळकळ असणार्‍या नागरिकांची आवश्यकता आहे. अशा नागरिकांनी ठरवले, तरच हा देश घुसखोरांपासून वाचू शकेल. त्यासाठी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) हवे !

– सौ. प्राजक्ता पुजार, पुणे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *