हिंदु जनजागृती समितीकडून चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी आणि सेन्सॉर बोर्ड यांना पत्र
मुंबई : आगामी हिंदुद्वेषी चित्रपट ‘पद्मावती’ आणि चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी, तसेच चित्रपट परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) यांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी नुकतेच निवेदन दिले आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ‘पद्मावती’ चित्रपटातील राणी पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्यावर आधारित काही वादग्रस्त प्रसंग जयपूरच्या किल्ल्यात चित्रीकरण होत असतांना करनी सेना या राजपूत संघटनेने संजय लीला भन्साळी यांना धडा शिकवला. या प्रसंगावरून बॉलीवूडच्या दिग्दर्शकांनी आणि अभिनेत्यांनी खूप मोठा वादंग चालू केला आहे; मात्र ‘सिनेमाच्या आणि कलेच्या नावाखाली हिंदूंच्या शौर्याच्या इतिहासाचे विकृतीकरण सहन करणार नाही’, हे जनतेने दाखवून दिले आहे.
या निवेदनात पुढे लिहिले आहे की,
१. ‘टॉयलेट-एक प्रेमकथा’ या सिनेमातूनही मथुरेतील परंपरांचा अपमान केल्याविषयी मथुरावासियांनी विरोध केला आहे. ‘पद्मावती’ चित्रपटाविषयीच्या अनुभवातून या दिग्दर्शकानेही धडा घ्यावा आणि हिंदु परंपरांचा अपमान करू नये.
२. सिनेमांतून चालणार्या या गैरकृत्यांना आणि इतिहासाच्या विकृतीकरणालाही सेन्सॉर बोर्डाने वेळीच नोंद घेऊन पायबंद घालावा, अशी आमची मागणी आहे.
३. राणी पद्मावती या शौर्यशाली हिंदु स्त्रियांपैकी एक आहेत. इस्लामी आक्रमकांच्या वासनेची शिकार न होता, इस्लाम धर्म न स्वीकारता स्वाभिमानाने अग्नीप्रवेश करून मृत्यूला कवटाळणारी आणि जोहार करणारी राणी पद्मावती त्यापैकीच एक होत.
४. कोणतेही ऐतिहासिक महापुरुष हे त्या त्या समाजाचे श्रद्धास्थान असतात. त्यामुळे त्यांच्याविषयी कोणतेही ऐतिहासिक संदर्भ सोडून जर काही प्रसंग दाखवले जात असतील, तर अशा चित्रपटांना विरोध होणे स्वाभाविक आहे.
५. यापूर्वीही आलेले जोधा-अकबर, बाजीराव-मस्तानी या दोन्ही चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड केल्याचे अनेक प्रसंगांतून लक्षात आले.
६. अशा ऐतिहासिक आणि परंपरांविषयीच्या चित्रपटाला विरोध होऊ नये, यासाठी चित्रपट दिग्दर्शक/निर्माते यांनी आधीच संबंधित समाजघटकांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घ्यावे आणि चित्रपटात कोणताही ऐतिहासिक संदर्भ सोडून प्रसंग दाखवणार नसल्याची लेखी हमी द्यावी.
७. असे झाल्यास हिंदु समाज मोकळ्या मनाने या चित्रपटाचे स्वागतच करेल; मात्र जर पुन्हा हिंदूंची फसवणूक करून चित्रपट निर्माते आपला गल्ला भरू पहाणार असतील, तर हिंदूंच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात