मुख्यमंत्र्यांनी भगव्या झेंड्याच्या संदर्भात केलेल्या व्यक्तव्याचे प्रकरण
सांगली : निवडणुकीच्या संदर्भात भाजपच्या झालेल्या एका मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘काही लोक भगवा झेंडा घेऊन खंडणी मागतात’, असे वक्तव्य केले होते. खंडणी गोळा करणारे कोण आहेत, हे जर मुख्यमंत्र्यांना ठाऊक होते, तर त्यांनी त्यांची नावे घेणे अपेक्षित होते. परमपवित्र भगवा ध्वज हा भारतीय आणि हिंदु संस्कृती यांचे प्रतीक आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, असे मत हिंदु एकता आंदोलनाचे संस्थापक श्री. नारायणराव कदम यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने ४ फेब्रुवारी या दिवशी स्टेशन चौक येथे निदर्शने करण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी हिंदु धर्माभिमान्यांची जाहीर क्षमा मागावी ! – नितीन शिंदे
भगवा ध्वज हा महाराष्ट्रातील तमाम वारकरी, धारकरी, तसेच हिंदुत्वनिष्ठ यांचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हा समस्त हिंदु धर्म आणि शिवभक्त यांचा अवमान आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हिंदु धर्माभिमानी-शिवभक्त यांची जाहीर क्षमा मागावी, असे मत माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी व्यक्त केले. या वेळी सर्वश्री अशोक पाटील, अमित सूर्यवंशी, नितीन आवळे, परशुराम चोरगे, तसेच अन्य उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात