‘सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे आणि देवतांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, यासाठी हे सदर प्रसिद्ध करत आहोत.’
१९.१.२०१७ – हंपी, कर्नाटक
कर्नाटकातील बेल्लारी या जिल्ह्यातील संडूर गावातील पर्वतावरील कार्तिकेयाच्या क्षेत्री, म्हणजे ‘स्कंद क्षेत्री’ जाणे
१ अ १. विभूतीची वैशिष्ट्ये : त्या विभूतीचे एक वैशिष्ट्य म्हणजे ती तोंडात घातली की, लगेच विरघळते. ही विभूती ग्रहण केल्यामुळे गावातील कित्येक लोकांना मधुमेह, रक्तदाब इत्यादी कोणतेही विकार नाहीत. गावातील लोक लहान मुलांना ताप आला, तर थोडी विभूती पाण्यात घालून औषध म्हणून देतात. गावातील लोकांचा विभूतीप्रती इतका भाव आहे. तेथील लोक ही विभूती प्रतिदिन तोंडाला लावतात. या विभूतीमध्ये एवढे सामर्थ्य आहे की, पुत्रप्राप्तीसाठी जरी कोणी ती खाल्ली, तरी त्याला पुत्रप्राप्ती होते. अशी ही विभूती आपल्याला आपत्काळात उपयोगी पडेल. ती आपत्काळासाठी संजीवनीच आहे.
१ अ २. गेरूमातीचा उपयोग : कार्तिकेय हा देवांचा सेनापती आहे. त्याच्यात मारक शक्ती आहे. त्यामुळे कार्तिकेयाच्या क्षेत्रातील गेरूमातीत देवसेनापतींची ऊर्जा आहे. तसेच तिच्यात आदीमाया आदीशक्तीचीही शक्ती आहे; कारण गेरूमाती म्हणजे पार्वतीचे रक्त आहे. त्यामुळे ही गेरूमाती पाण्यात घालून त्याने मंडल काढल्यास त्या मंडलामध्ये असलेल्या एखाद्या वस्तूचे किंवा वास्तूचे रक्षण होईल. महर्षींनी आम्हाला आश्रम आणि आमची दौर्याची चारचाकी गाडी यांच्याभोवती गेरूमातीचे मंडल का काढायला सांगितले आहे, ते लक्षात आले.
१ आ. कार्तिकेयाच्या ‘क्रौंचगिरी’वरील १०८ तीर्थांपैकी ‘हरिशंकर तीर्थ’ येथे जाणे : या कार्तिकेयाच्या ‘क्रौंचगिरी’वर १०८ तीर्थे आहेत. जिथे जिथे कार्तिकेयाने आपले चरण लावले, तिथे तिथे तीर्थे निर्माण झाली आहेत. यांतील बरीचशी तीर्थे जंगलात दुर्लक्षित आहेत. त्यामुळे ती कोणाला ठाऊक नाहीत. या तीर्थांच्या ठिकाणी १२ मास आणि २४ घंटे पाणी वहाते; पण हे पाणी कुठून येते अन् पुढे कुठे जाते (गुप्त होते), हे कळत नाही. या तीर्थांतील ‘हरिशंकर तीर्थ’ येथे आम्ही गेलो होतो.
– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात