सातारा : मंदिरे हिंदु धर्मियांची ‘चैतन्यस्रोत’ आहेत. त्यांची काळजी घेणे आणि संरक्षण करणे, हे हिंदूंचे आद्यकर्तव्य आहे. ‘देव मस्तकी धरावा । अवघा हलकल्लोळ करावा ॥’ या समर्थ रामदासस्वामींच्या उक्तीप्रमाणे प्रत्येक हिंदूने देव आणि देवालये यांच्या रक्षणासाठी सिद्ध झाले पाहिजे. सध्या श्रीमंत देवस्थानांवर स्वार्थी राज्यकर्त्यांची वक्रदृष्टी पडली असून एकेक करून ही मंदिरे कह्यात घेण्याचा धडाका शासनाने लावला आहे. मंदिर सरकारीकरणाचा धोका लक्षात घेऊन हिंदूंनी संघटित व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेचे श्री. राहुल कोल्हापुरे यांनी केले. तासगाव (जिल्हा सातारा) येथील श्रीभैरवनाथ मंदिरामध्ये लघुरुद्र आणि महरुद्र आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.
या वेळी व्यासपिठावर श्रीक्षेत्र जरंडेश्वर येथील मारुती उपासक संत पू. धनंजयगिरी महाराज उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. हेमंत खटावकर यांनी केले. या कार्यक्रमाचा लाभ तासगाव आणि पंचक्रोशीतील भाविकांनी घेतला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात