जळगाव : रामजन्मभूमी सूत्राचा निवडणुकीतील लाभासाठी वापर करून घेऊ नका, तर राममंदिर प्रत्यक्ष उभारणीसाठी ध्येय धोरणे ठरवून बांधावे. संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू करून हिंदूंवरील अन्याय दूर करावेत, असे उद्गार हरिद्वार येथील डॉ. प्राचीदेवी यांनी यावल तालुक्यातील आडगाव येथे बाबा महाहंस यांनी आयोजित केलेल्या १००८ कुंडी यज्ञ प्रसंगी समारोपाच्या सत्रात केले. या वेळी व्यासपिठावर करवीरपिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंहभारती, वेरुळ येथील पू. शांतीगिरी महाराज, ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते, दिनानाथ महाराज, ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे, सिंधुताई सपकाळ यांच्यासह अन्य संत-महंत उपस्थित होते.
दीनानाथ महाराज यांनी गोसंवर्धन ही काळाची आवश्यकता असून भारतात आज आठ कोटी गायी असून ३६ सहस्र पशुवधगृहे आहेत. यासाठी संपूर्ण भारतात गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोरपणे कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. सिंधुताई सपकाळ यांनी सांगितले की, गाय आणि माय जपायला शिकले पाहिजे, देशाची वेदना झाकण्यासाठी महिलेची आवश्यकता असून काळीज दगडाचे व्हायला नको, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी अन्य वक्त्यांची भाषणेही झाली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात