Menu Close

‘इसिस’च्या ताब्यात ३५०० ‘गुलाम’

जिनिव्हा : ‘इसिस‘ने इराकमध्ये अनेक नागरिकांचे अपहरण करून त्यांना गुलाम बनविले असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केली आहे. या दहशतवाद्यांच्या ताब्यात किमान साडेतीन हजार नागरिक असून, यामध्ये महिला आणि लहान मुलामुलींचे प्रमाण मोठे असल्याचे राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

“इसिस‘च्या ताब्यात सीरियाचाही मोठा भाग असून, त्यांनी अनेक ठिकाणी मानवी मूल्ये पायदळी तुडवत क्रूर हत्या केल्या असून, काही भागांत वंशच्छेदही केल्याची माहिती अहवालात दिली आहे. एखाद्या भागावर ताबा मिळविल्यानंतर अपहरण केलेल्या नागरिकांपैकी पुरुषांना ठार मारून महिला आणि बालकांना ओलिस ठेवण्याकडे त्यांचा कल आहे. या महिला बहुतांशी याझदी समुदायाच्या आहेत. गोळी घालून ठार मारणे, शिरच्छेद करणे, रणगाड्याखाली चिरडणे, जिवंत जाळणे आणि उंच इमारतीवरून ढकलून देणे अशा क्रूर शिक्षा “इसिस‘कडून दिल्या जात आहेत. हाती लागलेल्या लहान मुलांना लष्करी आणि धार्मिक शिक्षण दिले जात असून, त्यांच्या ताब्यात अशी आठशे ते नऊशे मुले असण्याचा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. या मुलांचा लहानपणापासूनच बुद्धिभेद करून त्यांना दहशतवादाच्या मार्गावर आणले जात असल्याने संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त केली आहे. अपहरण केलेल्यांना वेळेवर जेवणही मिळत नसल्याने अनेकांचा भुकेने तडफडून मृत्यू झाल्याचा अंदाजही अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
संदर्भ : सकाळ 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *