कर्नाटकातील दिडुपे आणि बागलकोट येथील हिंदु धर्मजागृती सभेत हिंदु ऐक्याचा हुंकार !
दिडुपे (कर्नाटक) : केवळ हिंदु धर्मामुळे जग अस्तित्वात आहे; मात्र आज हिंदु धर्मावरच आघात होत आहेत, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. संपूर्ण विश्वच हिंदु संस्कृतीच्या अध्ययनासाठी भारताकडे वळत आहे आणि भारतीय मात्र पाश्चात्त्य संस्कृतीच्या आकर्षणाला बळी पडत आहेत. त्यामुळे धर्मावर होणार्या आघातांना सामोरे जाता येण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करणे आवश्यक आहे. अशा स्थितीत संतांच्या कृपाशीर्वादाने हिंदु जनजागृती समिती भारताला विश्वगुरु म्हणून पुनर्प्रस्थापित करण्यासाठी कार्य करत आहे, असे प्रतिपादन मूडबिद्रे येथील करींजे मठाचे श्रीश्रीश्री मुक्तानंद स्वामीजी यांनी दिडुपे येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ५ फेब्रुवारी या दिवशी आयोजित हिंदु धर्मजागृती सभेत केले.
श्रीश्रीश्री मुक्तानंद स्वामीजी यांनी केलेल्या दीपप्रज्वलनाने धर्मजागृती सभेला प्रारंभ झाला. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. संगीता प्रभु, हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण कन्नड जिल्हा समन्वयक श्री. चंद्र मोगेर, रणरागिणी शाखेच्या सौ. लक्ष्मी पै यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सभेचा अनुमाने ७५० हून अधिक धर्माभिमान्यांनी लाभ घेतला. या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने भगवे ध्वज लावून भव्य वाहनफेरी काढण्यात आली होती.
स्वसंरक्षणासाठी प्रत्येक हिंदु स्त्रीने जागृत होणे आवश्यक ! – सौ. लक्ष्मी पै, रणरागिणी शाखा
आज शैक्षणिक, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय इत्यादी सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्य करत आहेत. महिला संघटनांनी महिलांचे अधिकार आणि स्वातंत्र्य यांसाठी लढा देत आंदोलन करूनही पूर्वीच्या तुलनेत महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे. यासाठी प्रत्येक स्त्रीने जागृत होऊन स्वसंरक्षण करण्यास शिकले पाहिजे.
हिंदु राष्ट्राची स्थापना हाच सर्व समस्यांवरील एकमेव उपाय ! – श्री. चंद्र मोगेर, दक्षिण कन्नड जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
पुढील २-३ वर्षांत आपल्याला भाषा, जाती, संप्रदाय, संघटना, पक्ष आदींमध्ये विभागल्या गेलेल्या हिंदु समाजाचे महासंघटन करायचे आहे. त्यातूनच प्रभावशाली संघशक्तीचा उदय होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेले आंदोलन निर्माण होईल !
देवतांचे विडंबन रोखणे, ही भगवंताची उपासनाच ! – सौ. संगीता प्रभु, प्रवक्ता सनातन संस्था
भगवंताची उपासना आणि धर्माचरण केल्याने आपण ईश्वरी कृपा ग्रहण करू शकतो. यातूनच आपल्याला धर्मकार्य करण्याची शक्तीही प्राप्त होते. राजकीय पक्ष हिंदूंच्या श्रद्धांवर आघात करणारा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणू पहात आहेत. प्रसारमाध्यमे, चित्रपट यांच्या माध्यमातून होणारा देवतांचा अवमान थांबवणे हीही काळानुसार भगवंताची उपासनाच आहे.
हिंदु धर्मजागृती सभेचा फलक फाडून हिंदुद्वेष्ट्यांकडून सभेला विरोध
या सभेनिमित्त ठिकठिकाणी प्रबोधनात्मक फलक लावण्यात आले होते. यावर सभेचे निमंत्रणही होते. सभेनिमित्त काडिरुद्दावरा या गावातील एरमाळ पालके या ठिकाणी लावलेला फलक हिंदुद्वेष्ट्यांनी फाडून टाकला. (विचारांचा प्रतिवाद विचारांनी न करता असा मार्ग अवलंबणार्यांची मानसिकता काय असेल, हे वेगळे सांगायला नको ! फलक फाडून त्यातले विचार नष्ट होत नाही, हे हिंदुद्वेष्ट्यांनी लक्षात घ्यावे. कितीही विरोध झाला, तरी संतांच्या आशीर्वादाने हिंदूसंघटनाचे कार्य उत्तरोत्तर वाढतच आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
सभेच्या दिवशी आणि आदल्या दिवशी पूर्वसिद्धतेसाठी ६०-७० धर्मप्रेमी स्वयंप्रेरणेने उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात