मुंबई : महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास पुन्हा रायगड महोत्सवाच्या निमित्ताने जागा केला जाणार आहे. प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई रायगड किल्ल्यावर शिवकालीन देखावे उभे करून पर्यटकांना शिवकाळात नेण्याचा प्रयत्न करणार आहेत. एखाद्या किल्ल्यावर प्रथमच अशा प्रकारचा महोत्सव राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे साजरा करण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महोत्सवाचे गुरुवारी उद्घाटन करण्यात येणार आहे. चार दिवसांच्या या महोत्सवासाठी सांस्कृतिक खाते तब्बल पाच कोटी रुपये खर्च करणार आहे.
मंगळवारी एक पत्रकार परिषद घेऊन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी रायगड महोत्सवातील कार्यक्रमांची माहिती दिली. ‘शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्यांना ठाऊक आहे परंतु त्यावेळचे वातावरण कसे होते, शिवाजी महाराज गडावर कसे राहत, कसा कारभार करीत याची ऐकीव माहिती आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही शिवकालीन काळ उभा करणार असून तो पर्यटकांना अनुभवता यावा आणि रायगड जागतिक पर्यटकांच्या नकाशावर यावे यासाठीच या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी केंद्रीय पुरातत्त्व खात्याकडून परवानगी घेतली असून कोणत्याही प्रकारचे बांधकाम न करता हा २२ ते २४ जानेवारीदरम्यान शिवकालीन इतिहास आयोजित करण्यात येणार आहे.२१ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. २२ तारखेपासून पर्यटकांसाठी हा महोत्सव खुला होणार असून तो सर्वांसाठी मोफत असेल. या महोत्सवासाठी ई-निविदा मागवण्यात आल्या होत्या आणि नितीन देसाई यांची निविदा यासाठी निवडण्यात आली.’
संदर्भ : दिव्य मराठी