श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीची डॉ. प्रवीण तोगडिया यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) : येथे ४ फेब्रुवारी या दिवशी पंढरपूर भेटीसाठी आलेले विश्व हिंदू परिषदेचे आंतराराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीणभाई तोगडिया यांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चालू असलेला अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार, भाविकांच्या भावना दुखावणारे निर्णय आणि शासनाचे याकडे असणारे दुर्लक्ष याविषयी माहिती देऊन ‘यामध्ये विश्व हिंदू परिषदेने लक्ष घालावे’, अशी मागणी करण्यात आली. ‘हे सर्व प्रकार थांबवण्यासाठी आणि हिंदूच्या मंदिरांचे पावित्र्य टिकवण्यासाठी विश्व हिंदू परिषद सर्वतोपरी प्रयत्न करील’, असे डॉ. तोगडिया यांनी सांगितले. या वेळी कृती समितीचे प्रवक्ते ह.भ.प. वीर महाराज, सदस्य रवींद्र साळे सर, गणेश लंके, अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु महासभेचे अध्यक्ष बाळासाहेब डिंगरे उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात