रियाध : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिम देशातील नागरिकांना अमेरिकेत येण्यावर निर्बंध घालण्यावर बरीच टीका झाली. मात्र, आता सौदी अरबिया या मुस्लिम बहुल देशाने गेल्या ४ महिन्यात तब्बल ३९ हजार पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवले आहे.
व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत केवळ ४ महिन्यातच सौदी सरकारने ३९ हजार पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवल्याची माहिती आता समोर आली आहे. याशिवाय पाकिस्तानी नागरिकांना देशात येण्याची परवानगी देण्याआधी त्यांची कसून चौकशी करण्यात यावी असा आदेश देण्यात आला आहे, कारण त्यांच्यातीलच काहींचा संबंध इसिस या दहशतवादी संघटनेशी असू शकतो अशी शंका सौदी सरकारला आहे अशी माहिती सौदी सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
याशिवाय काही पाकिस्तानी नागरिकांना अंमली पदार्थ तस्करी, चोरी, फसवणूक, आणि मारामारीसारख्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर शूरा काऊन्सिलच्या सुरक्षा समितीचे अध्यक्ष अब्दुला अल-सादो यांनी पाकिस्तानी नागरिकांना कामावर ठेवण्याआधी त्यांची योग्य ती तपासणी करावी, अशा सूचना दिल्या आहेत.
याखेरीज, सौदीमध्ये नोकरीसाठी येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची इत्यंभूत माहिती मिळवण्याच्ये आदेश दिले आहेत. याबरोबरच कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाचा राजकीय आणि धार्मिक कल कोणत्या बाजूने आहे, हे जाणून घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी नोंदवले आहे.
संदर्भ : लोकमत