बैतुल : भारतातले मुस्लिम भलेही इस्लाम मानत असोत, पण त्यांची राष्ट्रीयता हिंदू आहे, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केले. मध्य प्रदेशातला आदिवासी जिल्हा बैतुल येथे एका हिंदू संमेलनात ते बोलत होते.
हिंदुस्थानचा प्रत्येक नागरिक हिंदूच आहे, मग भलेही तो कोणत्याही धर्माचे अनुकरण करत असो, असे उद्गार त्यांनी या संमेलनात काढले. आपल्या २८ मिनिटांच्या भाषणात भागवतांनी हिंदूंच्या एकतेची आवश्यकता प्रतिपादित करून लोकांना एकजुटीचे आवाहन केले.
राष्ट्रीयतेची नवी परिभाषा सांगत भागवत म्हणाले, ‘जसे अमेरिकेचे नागरिक अमेरिकी आणि जर्मनीच्या नागरिकांना जर्मन म्हटले जाते, तसे हिंदुस्तानातला प्रत्येक नागरिक हिंदू आहे.’
या संमेलनाची तयारी गेल्या ६ महिन्यांपासून सुरू होती. बैतुलचीच या संमेलनासाठी निवड करण्याचे कारण म्हणजे या आदिवासी जिल्ह्यात मिशनरी सक्रीय आहेत. येथे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर करण्यात आल्याचाही आरोप केला जातो.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स