सोलापूर : ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालयांत ‘मातृ-पितृ दिवस’ म्हणून साजरा करा, या मागणीसाठी रणरागिणी शाखेच्या वतीने येथे ८ फेब्रुवारीला राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी ५५ हून अधिक हिंदुत्वनिष्ठ आंदोलनात सहभागी झाले होते. यानंतर जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांना निवेदन देण्यात आले. ते म्हणाले, ‘‘तुमचा उपक्रम चांगला आहे. मातृ-पितृ पूजनाची संकल्पना चांगली असून अशा उपक्रमांना शासनाचे साहाय्य राहील.’’
मुलांनी भारतीय संस्कृतीचे आचरण करावे, यासाठी पालकांनी लक्ष द्यावे ! – सौ. गार्गी काळे, भारुडकार
आज शाळेतून लहान मुलांना चित्रपटातील गाण्यांच्या तालावर नाचण्यासाठी प्रवृत्त केले जाते. वर्तमानपत्रां तून ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यासाठी काय करायचे, अशा विकृत संकल्पना मांडल्या जातात. हे थांबवण्यासाठी पालकांनी मुलांचे प्रबोधन करून त्यांना भारतीय संस्कृतीचे आचरण करण्यासाठी सांगावे.
‘डे’च्या माध्यमातून हिंदूंच्या धर्मांतरणाचे षड्यंत्र ! – सौ. रोहिणी तडवळकर, माजी विरोधी पक्षनेत्या, सोलापूर महानगरपालिका
‘डे’च्या माध्यमातून विदेशी शक्तींकडून हिंदूंचे धर्मांतर करण्याचे षड्यंत्र होत आहे. सर्व हिंदूंनी संघटित होऊन याला तीव्र विरोध केला पाहिजे. रणरागिणी शाखेच्या जिल्हा संघटक सौ. अलका व्हनमारे यांनी ‘रणरागिणींचा आदर्श घेऊन परंपरांचे रक्षण करण्यासाठी संघटित होऊया’, असे आवाहन केले, तर हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी म्हणाल्या, ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करणे म्हणजे पाश्चात्त्यांच्या नीतीहीनतेचे अनुकरण अन् संस्कृतीचे अवमूल्यन होय.’’ या वेळी सतीश तमशेट्टी, बजरंग दलाचे केशव प्रखंड संयोजक सिद्राम चरकुपल्ली, योग वेदांत सेवा समितीचे साधक बालाजी दुडम यांनीही मनोगत व्यक्त केले.
रणरागिणी शाखेच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या
१. १४ फेब्रुवारीला शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात अपप्रकार करणार्या युवकांना कह्यात घेणे, वेगाने वाहने चालवणार्यांवर कारवाई करणे, अशा उपाययोजना आखा.
२. ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त होणारे अपप्रकार पहाता शिक्षणाधिकार्यांनी प्राचार्यांची बैठक घेऊन महाविद्यालयात ‘व्हॅलेंटाईन डे’चे तोटे सांगावेत आणि भारतीय संस्कृतीची माहिती देणार्या व्याख्यानांचे आयोजन करण्याविषयी शिक्षणाधिकार्यांना निर्देश द्यावेत.
आंदोलनात सहभागी अन्य मान्यवर
राधाकृष्ण गो शाळेचे अभय कुलथे, यशपाल चितापुरे, सनातन संस्थेचे हिरालाल तिवारी, सतीश तमशेट्टी, श्रीराम सेनेचे शहर संयोजक परमेश्वर माळगे, नरहरी म्याकल, प्रभाकर गाजर्ला
क्षणचित्रे
१. ८३ वर्षीय प्राणीमित्र श्री. विलासभाई शहा हे महत्त्वाच्या न्यायालयीन कामातून वेळ काढून आंदोलनाला आवर्जून उपस्थित होते.
२. महाविद्यालयातील मुले आंदोलनाचा विषय पाहून आंदोलनात सहभागी होत होती.
३. विविध विभागाचे पोलीस आंदोलनाविषयी चौकशी करत होते. (हाच चौकशीचा वेळ पोलिसांनी आतंकवाद्यांच्या शोधार्थ दिला असता, तर देश एव्हाना आतंकवादमुक्त झाला असता ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात