लक्षावधी शिवभक्तांच्या उपस्थितीत ‘गडकोट मोहिमे’चा समारोप !
विशाळगड (जिल्हा कोल्हापूर) : मातृभूमी, आई आणि बहीण यांच्या शीलाचे रक्षण प्रत्येकाने केलेच पाहिजे. त्यादृष्टीने गोरक्षण करणे, बलात्का-यांवर कठोर कारवाई करणे आणि संपूर्ण दारूबंदी करणे अत्यावश्यक आहे. तसे कायदे न झाल्यास लाखो माताभगिनींना समवेत घेऊन येत्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेला वेढा घालणार आहे. कठोर कायदे करण्यासाठी प्रसंगी विधानसभा आणि राजधानी मुंबईसुद्धा कोंडून टाकू. यापुढे जो उमेदवार या आश्वावसनांची पूर्तता करण्याचे लिहून देईल, त्यालाच निवडून दिले जाईल, असे प्रतिपादन पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ते श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गडकोट मोहिमेची सांगता करतांना विशाळगड येथे बोलत होते. अलोट गर्दीत शिवभक्तांच्या साक्षीने नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि श्री फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधी परिसरात हा सोहळा पार पडला. १ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पन्हाळगड ते विशाळगड या मार्गे गडकोट मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा मोहिमेचे ३३ वे वर्ष होते.
ते पुढे म्हणाले, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान छत्रपती शिवाजी महाराजांचे ३२ मण सोन्याचे सिंहासन रायगडावर पुन्हा स्थापन करणार आहे. आतंकवाद कसा संपवावा, ते सांगण्यासाठी अफझलखान वधाचे स्मारक प्रतापगडाच्या कुशीत आणि बलात्का-यास कशी शिक्षा दिली जाते, याचे स्मारक लालमहालात उभारण्याची मागणी त्यांनी या वेळी केली.
अशी झाली गडकोट मोहीम
१. गडकोट मोहिमेचा आरंभ पन्हाळगड येथून पहाटे ३ वाजता झाला.
२. मोहिमेच्या सकाळच्या सत्रात प्रतिदिन सामूहिक सूर्यनमस्कार, बैठका, जोर असा व्यायाम होत असे.
३. पांढरपाणी येथे बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची भेट झाली होती. त्या पांढरपाणीच्या पवित्र भूमीत इतिहासतज्ञ डॉ. अमर आडके यांनी पावनखिंडीचा रणसंग्राम उपस्थितांसमोर उभा केला.
४. मोहिमेत मान्यवर वक्त्यांची प्रतिदिन व्याख्याने झाली. या वेळी ज्येष्ठ इतिहासकार श्री. पांडुरंगराव बलकवडे, सुदर्शन वाहिनीचे
श्री. सुरेश चव्हाणके, धारकरी श्री. मिलिंददादा तानवडे, समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर, इतिहासकार डॉ. अमर आडके आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात