तथाकथित बुद्धिप्रामाण्यवाद्यांना चपराक ! याविषयी अंनिसला काय म्हणायचे आहे ?
पुणे : आईनस्टाईनसारखा वैज्ञानिकही शेवटी अज्ञात शक्तीला मान्यता देतो. विज्ञानाला विश्वासंबंधी जाणून घेण्याची तीव्र इच्छा असते आणि येथेच अध्यात्माची भूमिका चालू होते. विज्ञानाला जेथे मर्यादा येतात, तेथे अध्यात्माचा प्रांत चालू होतो, असे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. सुबोध पंडित यांनी केले. विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एम्आयटी, पुणे यांच्या वतीने ७ फेब्रुवारीला आयोजित केलेल्या एका विशेष व्याख्यानाप्रसंगी ‘अध्यात्म आणि धर्म यांचा पुरस्कार करण्यामधील विज्ञानाची भूमिका’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी माईर्स एम्आयटीचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, विचारवंत डॉ. एडिसन सामराज, नागपूर विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ. एस्.एन्. पठाण आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सुबोध पंडित म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी म्हटले पाहिजे की, हे मला ठाऊक नाही; परंतु ते जाणून घेण्याची माझी सिद्धता आहे. मी सर्वज्ञ आहे, असा दावा कोणीही करू नये. एखादी घटना कशी घडली, हे जाणून घ्या. त्यावर प्रयोग करा; पण हे लक्षात ठेवा की, परमेश्वर ही सर्वोच्च शक्ती आहे. भौतिक शास्त्र म्हणजे ज्ञान, शांतता म्हणजे सुसंवादाचे प्रकटीकरण आणि अध्यात्म म्हणजे आत्म्याशी एकरूपता. जेथे प्रज्ञेचा संबंध येतो. धर्म म्हणजे विशिष्ट चौकटीतील अध्यात्म. विज्ञान आणि तत्त्वज्ञान हे अर्थातच एकमेकांशी संबंधित असतात.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात