श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या जुन्या छायाचित्रात नागचिन्ह दिसत असल्याने मूर्तीवरील नागचिन्ह कोणी काढले, याचा शोध पुरातत्व विभागाने घेणे आवश्यक आहे. असे असतांना स्वतःचे दायित्व झटकणारा आणि पुरातन मूर्तींचे योग्य प्रकारे जतन न करणारा पुरातत्व विभाग काय कामाचा ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कोल्हापूर : पुरातत्व विभागाच्या रसायनतज्ञ विभागाच्या उपअधीक्षकांनी श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेच्या वेळी मूर्ती आमच्याकडे सोपवली. तेव्हा मूर्तीवर नागचिन्हाचे निशाण आणि शंख नव्हता. केवळ म्हळुंग आणि गदा होती’, असे स्पष्टीकरण शासनाच्या पुरातत्व खात्याच्या संभाजीनगर विभागाने दिले आहे. सामाजिक कार्यकर्ते श्री. शरद तांबट यांनी माहितीच्या अधिकाराखाली पुरातत्व खात्याच्या संभाजीनगर विभागाकडे खुलासा मागवला होता. त्याविषयी पुरातत्व विभागाने वरील उत्तर दिले आहे.
१. श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या रासायनिक संवर्धनात राहिलेले नागचिन्ह आणि इतर आयुधे कोरली नसल्याने पुरातत्व खात्याने केलेली रासायनिक संवर्धन प्रक्रिया अपूर्ण राहिली आहे. याविषयी श्री. तांबट यांनी माहिती मागवली होती.
२. नियमानुसार संवर्धन करतांना मूर्तीवर ज्या गोष्टीचा अवशेष नसतो, अशा गोष्टी नव्याने बनवल्या जात नाहीत. त्यामुळे नागचिन्ह, शंख बनवण्याचा प्रश्नच नाही, असे पुरातत्व विभागाने म्हटले आहे.
३. माहितीच्या अधिकाराखाली मागवण्यात आलेल्या अन्य माहितीमध्ये जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांनी ‘मूर्तीवरील नागचिन्हाविषयी कोणताही निर्णय घेण्याचे आम्हाला अधिकार नाहीत’, अशी प्रतिक्रिया त्या वेळी दिली होती.
४. शासनस्तरावर सर्वसमावेशक संवर्धन समिती नियुक्त करण्याचे आश्वासन जिल्हाधिका-यांनी दिले होते. त्याचे काय झाले ? असा प्रश्न विचारून श्री. तांबट यांनी ‘या संवर्धन प्रक्रियेचे केलेले चित्रीकरण प्रसारित करण्यात यावे’, अशी मागणी केली आहे. यावर ‘आमच्या विभागाशी याचा काहीही संबंध नसल्याने त्याची उत्तरे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घ्यावीत’, असे पुरातत्व खात्याने म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात