बैरुत : दोन अमेरिकन पत्रकारांसहित इतर अनेक बंदिवानांचा शिरच्छेद केलेला इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेमधील ‘जिहादी जॉन‘ हा दहशतवादी ठार झाल्याची पुष्टि इसिसने केली आहे.
इसिसचे ऑनलाईन मासिक दाम्बिकमधून इसिसने दावा केला आहे, की जिहादी जॉनचा नोव्हेंबरमध्येच ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला आहे. सीरियातील इसिसचा प्रभाव असलेल्या राक्का शहरात मोटारीतून जात असताना जिहादी जॉनच्या मोटारीवर ड्रोनमधून हल्ला करण्यात आला होता. यात त्याची मोटार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती.
मोहम्मद एमवाझी उर्फ जिहादी जॉन अशी त्याची ओळख होती. एमवाझी प्रवास करत असलेल्या वाहनावर अमेरिकेच्या ड्रोन विमानाने हल्ला केल्याचे एका अमेरिकन अधिकाऱ्याने यापूर्वीच स्पष्ट केले होते. या वृत्तात तथ्य असल्याचे इसिसनेही आज स्पष्ट केले आहे. स्टीव्हन सॉटलॉफ आणि जेम्स फॉली या अमेरिकन पत्रकारांसहित इतर अनेक परदेशी नागरिकांचा शिरच्छेद जिहादी जॉनने केल्याचे मानले जात आहे. जिहादी जॉन हा ब्रिटीश नागरिक होता आणि त्याची गेल्यावर्षी ओळख पटली होती.
संदर्भ : सकाळ