आज असलेल्या श्री मलंग पालखी सोहळ्याच्या निमित्ताने…
हिंदुबहुल देशात हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या रक्षणासाठी न्यायालयाची पायरी चढावी लागणे हे दुर्दैव !
॥ ॐ नमो श्री मलंग मत्स्येंद्राय ॥
कल्याण येथे मलंगगड या नावाने हिंदूंचे एक देवस्थान आहे. तेथे मच्छिंद्रनाथांची समाधी हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. अशा स्थानावर धर्मांध अतिक्रमण करून तेथे वक्फ मंडळाचे आधिपत्य आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे स्थान हिंदूंचे असावे कि वक्फ मंडळांतर्गत यावे, याविषयी न्यायालयीन लढाई चालू आहे. असे असूनही धर्मांध अवैधपणे हे स्थान बळकावू पहात आहेत. आज ११ फेब्रुवारी या दिवशी गडावर श्री मलंग पालखी सोहळा होत आहे, त्यानिमित्ताने याविषयी न्यायालयात प्रविष्ट असलेल्या दाव्याची थोडक्यात माहिती देत आहोत.
श्री किल्ले मलंगगडावर धर्मांधांचा शिरकाव आणि अतिक्रमण
वज्रेश्वरी दिव्य महात्म्यामध्ये श्री क्षेत्र वज्रेश्वरीपासून ४ योजने दूर असलेल्या एका किल्ल्याचा उल्लेख केला आहे. हा किल्ला म्हणजे कल्याणजवळील श्री किल्ले मलंगगड होय. हे स्थान बुवा मलंग आणि बाबा मलंग म्हणून प्रसिद्ध होते. वर्ष १९२८ ते १९३५ या काळात उत्तरप्रदेशातील खुदाई खिसमतगार या संघटनेचे एक अनुयायी येथे सेवेसाठी राहू लागले. हे गृहस्थ स्वत:ला साईबाबा म्हणवून घेत. त्यांच्या येण्याने गडावर मुसलमानांचे येणेजाणे वाढले. त्यांना नमाजपठणसाठी एक मशीद आणि उलू करण्यासाठी एक तलाव बांधण्यात आला. नंतर या गडाला हाजी मलंग या नावाने प्रसिद्धी देण्यात आली. त्यानंतर स्थानाच्या मूळ परंपरांतर्गत चालत आलेल्या पूजेच्या प्रथेत पालट करण्यात येऊ लागले. सेवेसाठी आलेली ती मुसलमान व्यक्ती मीच या स्थानाचा वहिवाटदार आणि मुजावर आहे, असे म्हणू लागली. अशा प्रकारे (हिंदूंचे स्थान असलेल्या) या गडावर (धर्मांधांकडून) अतिक्रमण करण्यात आले. गडाची ही जागा वक्फ मंडळाच्या अंतर्गत आणण्यासाठी (धर्मांधांनी) खटाटोप चालू केला.
प.पू. मोहनदादा गोखले यांनी अतिक्रमण रोखण्यासाठी न्यायालयात याचिका प्रविष्ट करणे
१६ हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या सहभागाने हिंदु मंच, जिल्हा ठाणे या संघटनेची स्थापना होणे आणि प्रतिवादी पक्षाने हे स्थान वक्फ मंडळाच्या अधिपत्याखाली येत असल्याचे दर्शवण्यासाठी प्रयत्न करणे : गडावरील पालखीस उपस्थित असणारे प.पू. मोहनदादा गोखले यांनी पुढाकार घेऊन हे अतिक्रमण थांबवण्यासाठी प्रयत्न चालू केले. त्यांनी भ्रमंती करून मलंग गडाविषयी पूर्ण माहिती घेतली आणि न्यायालयात दावा प्रविष्ट करून अनेकांच्या भेटी घेतल्या. या दाव्याला हिंदु समाजाचा पाठिंबा आहे, हे सांगण्यासाठी स्वाक्षर्यांची मोहीम घेण्यात आली. सर्व संप्रदाय प्रमुखांनी सहयोगी पत्रे देऊन, अनेक स्थानांचा अभ्यास करून पुरावे, छायाचित्र, ग्रंथ, ऐतिहासिक दस्तऐवज जमा करून दाव्याची आखणी झाली. ४ फेब्रुवारी १९८२ या दिवशी न्यायालयाने दावा स्वीकारून त्यास सिव्हिल सूट क्रमांक १/१९८२ देण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, शिवसेना, हिंदु महासभा आदी १६ हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या सहभागाने हिंदु मंच, जिल्हा ठाणे या संघटनेची स्थापना करण्यात आली. प्रतिवादी पक्षाला हे स्थान हाजी मलंग म्हणून सिद्ध करणे कठीण होत असल्याने त्यांनी उच्च न्यायालयाची स्थगिती मिळवली आणि वेळकाढूपणा केला. यासह या दाव्यात सादर केलेले पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न प्रतिवादी पक्ष करत आहे. उच्च न्यायालयाचा अवमान करून हे स्थान वक्फ मंडळाच्या अधिपत्याखाली येत असल्याचे दर्शवण्यासाठी उघडपणे प्रयत्न चालू आहेत.
अतिक्रमण हटवण्यासाठी शासनाला भाग पाडा !
केतकर कुटुंबियांचे असलेले हे खाजगी देवस्थान सध्या सार्वजनिक न्यास नोंदणीकृत झाले आहे. इस्लाम धर्माप्रमाणे मान्यता असलेल्या कोणत्याही कार्यासाठी हे कायमस्वरूपी अर्पण किंवा दान म्हणून देण्यात आलेले नाही. त्यामुळे हा न्यास वक्फ होऊ शकत नाही. मूळ इस्लाममध्ये प्रतीक पूजेची संकल्पनाच नाही, तर हे देवस्थान मुसलमानांचे स्थान कसे होऊ शकते ? यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करून सरकारला देवस्थानासंदर्भात योग्य निर्णय घेण्यासाठी भाग पाडू शकतो.
देवस्थान वक्फ मंडळाच्या अधिपत्याखाली येत असल्याचे दर्शवण्यासाठी होणारे अवैध प्रयत्न
१. या दाव्यामध्ये महाराष्ट्र शासन आणि नासिरखान फाजलखान हे प्रतिवादी आहेत. प्रतिवादी असूनही महाराष्ट्र शासनाने गॅझेटमध्ये देवस्थान वक्फ म्हणून घोषित केले.
२. नासिरखान फाजलखान यांनी वर्ष २००२ मध्ये न्यायालयात स्थगितीविषयी दावा प्रविष्ट करूनही न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पहाता देवस्थान वक्फ मंडळाच्या अधिपत्याखाली नोंदवण्यासाठी २ वेळा स्वाक्षरीने अर्ज केले. हा एकप्रकारे न्यायालयाचा अवमानच आहे.
३. साहाय्यक धर्मादाय आयुक्त, ठाणे यांनी मुख्य धर्मादाय आयुक्त, मुंबई यांच्याकडून निर्देश मागवले. लेखी निर्देश मागवल्यानंतर वक्फ मंडळाकडील पत्राचा आधार घेऊन विश्वस्त नेमणुका स्थगित केल्या. हाही धर्मादाय आयुक्तांच्या हुकुमाचा अवमानच आहे.
४. वक्फ ही संस्थाही राज्यशासनाची असून त्यावर शासकीय अधिकारीच काम करत असतात. असे असूनही त्यांनी विश्वस्त नेमणूक प्रक्रिया थांबवण्यासाठी पत्र दिले.
५. वर्ष २००४/२००६ मध्ये महाराष्ट्र शासनाने सर्व मुसलमान प्रार्थनास्थळे वक्फ म्हणून घोषित केली. याला केवळ मलंगगडाचा अपवाद होता, तरीही शासनाने त्याला वक्फ म्हणून घोषित केले.
मलंगमुक्तीसाठी सहस्रो शिवसैनिक मलंगगडावर जाणार !
कल्याण : मलंगमुक्ती आंदोलन हे कुणा धर्माविरुद्ध नसून सत्य आणि असत्य यांची लढाई आहे. मलंंगगड हे हिंदूंचे पवित्र धार्मिक स्थळ असून न्यायालयात आम्ही हा लढा जिंकू, असा विश्वास शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी व्यक्त केला. मलंगगडावर मलंगबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांसह हिंदु समाज मोठ्या संख्येने जाणार आहे, असेही ते म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूंची वहिवाट हीच मलंगमुक्तीची पहाट असा जयघोष करत मलंगबाबांच्या समाधीदर्शनाची प्रथा चालू केली होती. ती आजही टिकून आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात